• Sat. Sep 21st, 2024

प्रकल्पांवर ‘तिसरा डोळा’, विशेष यंत्रणा ठेवणार देखरेख, MMRDA आयुक्तांना एका क्लिकवर माहिती कळणार

प्रकल्पांवर ‘तिसरा डोळा’, विशेष यंत्रणा ठेवणार देखरेख, MMRDA आयुक्तांना एका क्लिकवर माहिती कळणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या तीन लाख कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांवर आता विशेष यंत्रणेकडून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (आयपीएमपी) उभा करणार आहे. त्याद्वारे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एका क्लिकवर प्रकल्पांची सद्यस्थिती पाहू शकतील.एमएमआरडीएकडून सहा मेट्रो मार्गिकांची उभारणी, दोन मेट्रो मार्गिकांचे व एका सेतूचे संचालन, विविध उड्डाणपूल, उन्नत मार्गिका, भूमिगत रस्ते, शहरी पायाभूत विकास कार्यक्रम अशी जवळपास तीन लाख कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये शेकडो प्रकारच्या कंत्राटांवर हजारो कंत्राटदार कार्यरत आहेत. प्रत्येक प्रकल्पाच्या कंत्राटांचा व कामकाजाचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा काम करीत असते. त्या यंत्रणेचा भार हलका करून डिजिटल व ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी ‘आयपीएमपी’ प्रणाली एमएमआरडीए उभी करणार आहे.

‘अनेकदा कंत्राटदार हा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन येतो. त्या प्रत्येक वेळी संबंधित कामाची इत्थंभूत माहिती घेणे शक्य नसते किंवा प्रत्यक्ष कामाची माहिती मिळविण्यात बराच वेळ जातो. या यंत्रणेत मात्र प्रत्येक कंत्राटदाराचे प्रत्येक काम आयुक्तांना एका क्लिकवर पाहता येणार आहे. त्यामुळे कंत्राटदाराने काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केले की, प्रत्यक्ष काम हे जीपीएस व डिजिटल पद्धतीने ऑनलाइन बघता येईल. एकूणच कंत्राटदारांची पळवाट रोखता येणार आहे,’ असे सूत्रांनी सांगितले. ही प्रणाली बसविण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. त्यामधील कंत्राटदाराला प्रणालीचे आरेखन करून प्रणाली विकसित करण्यासह त्याची अंमलबजावणी व देखभाल करायची आहे.

‘आयपीएमपी’ची वैशिष्ट्ये

– सर्वसमावेशक अंदाजपत्रक तयार करणे

– मजबूत प्रकल्प व्यवस्थापन क्षमता तपासणे

– एकात्मिक वित्तीय खाते व्यवस्थापन

– उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यक्षम प्रणाली

– रिअल-टाइम प्रकल्प देखरेख

– प्रलंबित समस्यांचे लवकर निराकरण करणे

– प्रकल्पावर अत्याधुनिक ड्रोन पद्धतीने देखरेख

– सुव्यवस्थित दस्तऐवजीकरण

– कार्यक्षम पेमेंट प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed