रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुरुवातीला एकनाथराव खडसे यांचे नाव पुढे आले होते. खडसे यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र प्रकृती स्थिर नसल्याकारणाने त्यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यांनीही आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारी नाकारली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपली उमेदवारी निश्चित झाली असे सांगितले त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढत मोठा जल्लोषही केला. मात्र पक्षाकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याचे समोर आले.
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी आधी नकार देत नंतर रावेर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा केला. त्यांनी मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यानंतर यावलचे अतुल पाटील यांचे नाव चर्चेत आले. अतुल पाटील हे यावल शहराचे माजी नगराध्यक्ष होते त्यांना देखील मुंबईमध्ये बैठकीत बोलवण्यात आले होते. मात्र आर्थिक सक्षम नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारासाठी इच्छुक असलेले विनोद सोनवणे व श्रीराम पाटील यांच्याही नावाची चर्चा झाली. पक्षाकडून सर्व तालुका अध्यक्षांचे मते जाणून घेतली दरम्यान या जागेसाठी पक्षातून वेगवेगळी नावे चर्चेच येत आहेत. त्यामुळे नावाविषयी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
रावेरचे परिचित उद्योजक श्रीराम पाटील यांनी महिनाभरापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) रावेर लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहेत. श्रीराम पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानंतर ते राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अजित पवार यांचा जिल्हा दौरा रद्द झाल्याने त्यांचा पक्ष प्रवेशही थांबला. गेल्या महिन्यातच पाटील यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.
श्रीराम पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर रावेर विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले. त्यात स्थानिक भाजपाला विश्वासात न घेतल्याने तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. त्यानंतर काल अचानकपणे राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) रावेर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी असा त्यांनी आग्रह केला आहे. त्यामुळे श्रीराम पाटील यांची नेमकी भूमिका काय या संदर्भात त्यांना पाच वेळा फोन केले असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यापासून रक्षा खडसे यांनी मतदारसंघांमध्ये प्रचारास सुरूवात केली आहे त्यामुळे भाजपाला प्रचारासाठी मुबलक वेळ मिळणार आहे. मात्र राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) अद्यापही कुठलाही उमेदवार जाहीर केला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) नेमकी कोणाला उमेदवारी देणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र जो तो माजी उमेदवारी निश्चित असल्याचे सांगून प्रचार सुरु करू लागला आहे.