भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यामधील चर्चेतून ज्या जागांचा तिढा सुटलेला आहे अशा ८ जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे ठाणे आणि कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो, तेथील उमेदवारांचा मात्र पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाहीये. विशेष म्हणजे कल्याण आणि ठाण्यासाठी भाजप आग्रही भूमिका आहे. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर, कुणाकुणाला संधी?
मावळ- श्रीरंग बारणे
हिंगोली-हेमंत पाटील
हातकणंगले- धैर्यशील माने
कोल्हापूर- संजय मंडलिक
बुलढाणा- प्रतापराव जाधव
रामटेक-राजू पारवे
शिर्डी- सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
ठाणे-नाशिकमध्ये काय होणार?
मुंबईसह ठाणे आणि नाशिक जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे ठाम आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी ते ही जागा सोडण्यास तयार नाहीत. तर, नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपचे शांतीगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी या चार जागा आपण कशा जिंकून आणू याचा लेखाजोखाच भाजपसमोर मांडल्याचे समजते.
उमेदवारीसाठी भावना गवळी मुंबईला रवाना
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चा वाढल्या असतानाच खासदार भावना गवळी आणि त्यांचे समर्थक मुंबईला रवाना झाले. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.