• Sat. Sep 21st, 2024
शाहूराजेंना मंडलिक टक्कर देणार, माने-शेट्टी पुन्हा सामना, CM शिंदेंच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारी संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच हातकणंगलेची जागा भाजपला मिळावी यासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे दोन्ही मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळाल्याचे समजते.

कोल्हापुरातून संजय मंडलिकच महायुतीचे उमेदवार

शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने दोघे शिंदे गटात गेले. यानंतर यंदाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक पार पडत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील महायुतीमध्ये सामील झाल्याने जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये अधिकच वाढत चालला होता. विशेषतः कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात भाजपने केलेल्या सर्वेबद्दल दोन्ही विद्यमान खासदारांना मतदारांनी नापसंती दर्शवल्याने भाजपने या दोन्ही जागांवरील उमेदवारी बदलाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली होती.
‘धैर्य’ सुटलं, तिकीट जाण्याची ‘भावना’, ‘गोड’सेंच्या मनी कटुता, भयभीत खासदारांची फौज ‘वर्षा’वर

शिवाय दोन्हीपैकी एक मतदार संघ हा भाजपला मिळावा यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्याला उमेदवारी मिळण्याबाबत शब्द घेत मतदारसंघात येत प्रचाराला सुरुवात केली होती. यामुळे संजय मंडलिक हे मीच कोल्हापूर लोकसभेचा महायुती कडून उमेदवार असणार असे ठामपणे सांगत होते.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त, आठ जणांची नावं होणार जाहीर, कुणाला संधी?

हातकणंगलेतून धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मात्र दुसऱ्या बाजूला गेल्या १५ दिवसात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी संदर्भात उलट सुलट चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या होत्या. धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार नाही तसेच ही जागा भाजपला जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती.त्यामुळे खासदार माने यांनी सातत्याने मुंबई दौरे करून उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती. अशातच काल मुंबई येथे मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खासदार माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दारात हेमंत गोडसेंचं शक्तिप्रदर्शन; नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादंग

दरम्यान धैर्यशील माने यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळतात कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाबाहेर फटाके उडवत जल्लोष केला आहे. सध्यातरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रातील हे दोन्ही गड आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आला आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महायुती कशी ताकद लावेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed