जानकर बारामतीतून लढल्यास कशी असतील राजकीय गणिते?
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सध्या हायहोल्टेज लढत म्हणून पाहिले जात आहे. कारण इथे पवार विरुद्ध पवार असा सामना मानला जात आहे. मात्र जर ऐनवेळी अजित दादांनी राजकीय खेळी करत महादेव जानकर यांना बारामतीतून लढण्यास सांगितले, तर पवारांना विरोध करणाऱ्या अनेकांना गप्प करण्यास अजित पवारांना यश येणार आहे.
दुसरीकडे, विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पवारांना धडा शिकवण्याची ही खरी वेळ असल्याची वल्गना त्यांनी केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवार यांचे काम करणार नसल्याचे अनेकदा बोलून दाखवले आहे.
इकडे अनंतराव थोपटे यांच्या मनात देखील पवार कुटुंबाबाबत सल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जर जानकर बारामतीतून लोकसभेचे उमेदवार झाले, तर एका दगडात अनेक पक्षी मारले जातील अशी शक्यता अनेक जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, जानकर हे शरद पवारांकडे माढ्यासाठी उमेदवारी मागत होते. मात्र ऐनवेळी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण महायुतीत असल्याचे स्पष्ट केले. मात्र आता ते परभणीतून, माढ्यातून की बारामतीतून लढणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. कारण २०१४ निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांना चांगली टक्कर देत मोठी मते मिळवली होती. त्यामुळे महादेव जानकर यांना कोणती उमेदवारी मिळते हे पाहणे आता महत्त्वाचे मानले जात आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
याबाबत महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली आहे.