• Mon. Nov 25th, 2024
    कथित ‘पीए’चे पितळ उघडे; शासकीय नोकरीचे आमिष दाखवून कोटींची फसवणूक, काय आहे प्रकरण?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करुन नागरिकांसह बँकांनाही लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या कथित ‘पीए’चा आणखी नवा प्रताप उघड झाला आहे. एका दाम्पत्याला शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ऐंशी लाख रुपये उकळणाऱ्या संशयित सुशील पाटील याला गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

    गंगापूर पोलिसांत सुभाष सुरेश चेवले (वय ३९, रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सुशील भालचंद्र पाटील (रा. लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, पंचवटी) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी चेवले हे टेलीकॉम व्यावसायिक आहेत. त्यांच्यासह पत्नीला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष संशयित पाटील याने सन २०२१ ते १३ मे २०२३ या कालावधीत दाखविले.

    कर भरण्यातील कुचराई चांगलीच महागात; नळ कनेक्शन कापले, थेट वाहनावर जप्ती

    कोण आहे संशयित?


    सुशील पाटील हा एका राजकीय पक्षातील नेत्याच्या ‘विशेष जवळ’ होता. तत्कालीन गृह राज्यमंत्र्याचा ‘खास’ असल्याची बतावणी करून त्याने तरुणांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सन २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध नाशिकमध्ये २ कोटी ७६ लाखांच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यावेळी त्याने चाळीसगावात राष्ट्रीयीकृत बँकेचीही फसवणूक केल्याचे उघड झाले. गंभीर बाब म्हणजे, बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून चार वाहने व्यावसायिक वापरासाठी मंजूर केली होती. दरम्यान, संशयिताने यापूर्वीही धुळे जिल्हा परिषद (गट क), महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन, वन विभागासह इतर विभागांमध्ये पदभरती असल्याच्या जाहिराती दाखवल्या होत्या. कोणत्या पदासाठी किती रक्कम लागेल, यासंदर्भात त्याने फिर्यादींना कळविले होते.

    संशयिताचे ‘कारनामे’…

    सन २०२३ : देवळाली कॅम्प परिसरातील अनिल अशोक आव्हाड यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. अनिलसह त्यांच्या नातेवाइकांपैकी काही जणांना शासकीय नोकरी लावून देण्यासाठी संशयिताने लाखो रुपये लुटले. मात्र, बनावट नियुक्तीपत्रे पुढे केल्यानंतर त्याचे पितळ उघडे पडले. मंत्रालयात ओळख असल्याची बतावणी करून संशयिताने हा प्रकार केला होता.

    सन २०२२ : संशयित पाटीलने मार्च २०२२ मध्ये गुजरात आणि राजस्थानच्या बड्या राजकीय नेत्यांसह पंधरा संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. त्यामध्ये राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाचेही नाव त्याने घेतले होते. राजस्थानचे ई-टॉयलेटसह पर्यटन विभागातील जाहिरातींच्या कंत्राटातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सहा कोटी ८० लाखांची फसवणूक झाल्याचा दावा त्याने केला होता. तेव्हापासून संशयित पाटील अनेक कारणांनी चर्चेत आहे.

    संशयिताला न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या आर्थिक व्यवहारांसह फसवणुकीच्या इतर मुद्द्यांचा तपास सुरू आहे. फसवणुकीची रक्कम कोठे वापरली, त्याचीही माहिती घेत आहोत.

    – मोतीलाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक, गंगापूर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *