• Mon. Nov 25th, 2024

    सीवूड्समध्ये ३८ सोसायट्यांची एकच होळी, सीवूड्स रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार

    सीवूड्समध्ये ३८ सोसायट्यांची एकच होळी, सीवूड्स रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : होळी सण उत्साहाने साजरा व्हावा आणि पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, यासाठी नवी मुंबईत जनजागृती केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक सोसायटीमध्ये होळी न पेटवता, एकेका सेक्टरमध्ये अनेक सोसायट्यांनी मिळून एक होळी साजरी करावी, यासाठी सीवूड्सवासींनी पुढाकार घेतला आहे. सीवूड्स रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशनने सोसायट्यांना पत्र पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी होणाऱ्या त्यांच्या या उपक्रमात दरवर्षी अनेक नवनवीन सोसायट्या सहभागी होत आहेत.

    नवी मुंबई शहर सेक्टरमध्ये विभागलेले आहे. एकेका सेक्टरमध्ये अनेक रहिवासी सोसायट्या आहेत. प्रत्येक सोसायटीतर्फे आपल्या आवारात एकेक होळी पेटवण्यात येते. त्यामुळे एका सेक्टरमध्ये किमान चार ते ५० होळ्या पेटवल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आणि होळी पेटवल्यावर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होते. त्यामुळे ज्याप्रमाणे गावात एकच होळी पेटवली जाते, त्याच पद्धतीने प्रत्येक सोसायटीमध्ये एकेक होळी उभारण्यापेक्षा सर्वानी मिळून एकत्र एकच सार्वजनिक होळी साजरी करूया, असे आवाहन सीवूड्स रेसिडेन्ट्स वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने केले जात आहे. त्यांच्या या आवाहनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानुसार सीवूड्स सेक्टर ४०, ४२मधील सोसायट्यांना हे आवाहन याही वर्षी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३८ सोसायट्यांनी मिळून एक सार्वजनिक होळी उपक्रमात सहभाग घेतला होता. यावर्षी ही संख्या वाढण्याची आशा असोसिएशनला आहे.

    विभागामध्ये सोसायट्यांची वेगवेगळी होळी पेटवण्याऐवजी सार्वजनिक होळी पेटवल्यास लाकडांची बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकेल आणि एक प्रकारे पर्यावरणाचे रक्षण होईल. त्यामुळे अधिकाधिक सोसायट्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने रवींद्र महाडिक यांनी केले आहे. यंदाचा हा १२वा सार्वजनिक होळी उत्सव असून आज, २४ मार्च रोजी रात्री ठीक साडेआठ वाजता सीवूड्सचा राजा चौक, सेक्टर-४२ मधील मैदानात गणेश मंदिरासमोर होळी पेटवून हा साजरा करण्यात येणार आहे.
    Holi 2024: जळो सर्व दोष, जळो सर्व ईर्ष्या; आज होलिकादहन, उद्या धूळवड
    टाकाऊ लाकूड देण्याचे आवाहन

    यावर्षी होळी पेटवण्यासाठी, वृक्षतोड न करता सोसायटीमधील रहिवाशांकडे जी काही टाकाऊ लाकडे असतील, ती त्यांनी या होळीसाठी मंदिराजवळ आणून ठेवावी किंवा जास्त प्रमाणात लाकडे असल्यास असोसिएशनला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *