शिवतारे पुढे बोलताना म्हणाले की, ना सुप्रिया सुळे ना सुनेत्रा पवार… तिसरा पर्याय म्हणून शिवतारे बापूंनाच मतदान करणार असल्याचे मतदारसंघातील नागरिक बोलून दाखवत आहेत. कारण या मतदारसंघातील नागरिकांना नेत्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागला आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी ही नामी संधी आहे, असे शिवतारे म्हणाले.
एक एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर मतदार संघातील उर्वरित तालुक्यात लोकांना आवाहन करून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. माझ्याकडे मोठी यंत्रणा नाही. कोणता पक्ष नाही. बुथ कमिटीवर कार्यकर्तेही नाहीत. माझ्याबरोबर आहे ती सामान्य जनता आहे. या जनतेला आवाहन करून पाचही मतदार विधानसभा मतदारसंघात प्रभावी सभा घेतल्या जातील, असे शिवतारे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दहशतवाद पोसला
१२ तारखेला बारा वाजता मी उमेदवारी दाखल करणार आहे आणि पाशवी शक्तीचे बारा वाजणार आहे. ज्या दिवशी चिन्ह मिळेल. ते चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा राबवू. रोडशो करत मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार. ४ जून रोजी जनशक्ती काय असते. लोकांच्या भावना काय असतात. हे दाखवू.. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दहशतवाद पोसला आहे, असा गंभीर आरोपही यावेळी शिवतारे यांनी केला.
अजित पवार गटाची शिवसेनेला वॉर्निंग
विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे वातावरण खराब करीत आहेत. शिवतारे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत आहे, पण मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरावे, बारामती मतदारसंघामध्ये शिवतारे महायुतीचा धर्म तोडत असतील तर महायुतीमध्ये शिवसेनाही ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे, तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाळणार नाहीत, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बुधवारी ठाण्यात दिला.