• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभा निवडणूक जाहीर होताच पोलीस अॅक्शनमोडवर, ‘अवैध हत्यारे’ बाळगणाऱ्यांची धरपकड,२४ संशयितांवर गुन्हे

    लोकसभा निवडणूक जाहीर होताच पोलीस अॅक्शनमोडवर, ‘अवैध हत्यारे’ बाळगणाऱ्यांची धरपकड,२४ संशयितांवर गुन्हे

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने अवैधरित्या शस्त्र बागळणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. सात दिवसांत शहरात २४ संशयितांवर गुन्हे नोंदवून २३ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अचानक वाढलेल्या कारवायांमुळे गल्लोगल्ली अवैध हत्यारांचा वापर होत असल्याचे समोर येत आहे. या सर्व संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

    पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेंतर्गत कार्यरत विशेष पथकाचे अंमलदार भगवान जाधव व दत्ता चकोर यांना एका व्यक्तीकडे अवैध पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, अंमलदार भूषण सोनवणे, दारूदत्त निकम यांनी पळसे परिसरात सापळा रचला. संशयित योगेश प्रल्हाद आहेर (वय ३९, रा. एकलहरा रोड) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. संशयिताविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, सात दिवसांत अवैध शस्त्रांबाबत अंबड पोलिसांत पाच, तर इंदिरानगर व आडगावच्या हद्दीत प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत. यासह नाशिकरोड, पंचवटीच्या हद्दीत प्रत्येकी दोन, तसेच गंगापूर, सातपूर आणि उपनगरच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे.

    – २४ संशयितांकडून २३ शस्त्रे हस्तगत

    – २ देशी कट्टे, ६ जिवंत काडतुसांचा समावेश

    – २१ कोयते, चॉपर, तलवार आणि सुरा

    – शस्त्रांची किंमत १ लाख २२ हजार ९५० रुपये

    – २४ संशयितांपैकी ६ विधिसंघर्षित

    – १५ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश

    – १९ ते ३९ वयोगटातील संशयितांचा समावेश

    – एका तडीपाराकडेही आढळला कोयता

    चार जनावरांची सुटका

    भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक संतोष नरुटे व सहायक उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे यांच्या पथकाची शनिवारी (दि. २३) सकाळी साडेसहा वाजता गस्त सुरू होती. त्यावेळी अंमलदार नितीन भामरे यांना कथडा परिसरात प्राण्यांना बांधून ठेवल्याचे समजले. पथकाने घटनास्थळी कलीम सलीम शेख (३२, रा. कथडा) या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गायींसह दोन वासरांची सुटका करण्यात आली. संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *