• Sat. Sep 21st, 2024

‘पीएमपी’ थांब्यांवर रिक्षांची चलती; बसचालकांच्या अडचणीत भर, रिक्षांवर कारवाईचे पथक गायब

‘पीएमपी’ थांब्यांवर रिक्षांची चलती; बसचालकांच्या अडचणीत भर, रिक्षांवर कारवाईचे पथक गायब

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसथांब्याच्या बाजूला व थांब्यावर उभे राहून रिक्षाचालक सर्रास प्रवासी गोळा करीत आहेत. या रिक्षांवर कारवाईस़ाठी पीएमपीने तयार केलेल्या पथकाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे पीएमपीचे थांबे बससाठी आहेत, की रिक्षांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पीएमपीने रिक्षांवर कारवाईसाठी तयार केलेले पथक नावालाच असल्याची परिस्थिती आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पीएमपीचे नऊ हजारांपेक्षा जास्त थांबे आहेत. पीएमपी बस थांब्याच्या बाजूला ५० मीटर अंतरापर्यंत रिक्षाचालकांना रिक्षा थांबविता येत नाही, असा नियम आहे; परंतु शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर रिक्षाचालक पीएमपी थांब्यावर रिक्षा उभा करून प्रवासी गोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. या रिक्षाचालकांचा पीएमपी थांब्यावरील प्रवाशांना त्रासदेखील होतो. तसेच, बस उभी करताना चालकांना अडचणी येतात. ही गोष्ट लक्षात घेऊन पीएमपीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपी बस थांब्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाईसाठी पथक तयार केले होते. या पथकाने शहरात फिरून वाहतूक पोलिस आणि ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या मदतीने रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आल्या होत्या. हे पथक निर्माण केल्यानंतर काही रिक्षाचालकांना समज देण्यात आली. तर, वारंवार बस थांब्यावर उभे राहत असलेल्या रिक्षाचालकांवर ‘आरटीओ’च्या मदतीने कारवाई करण्यात आली होती. दोन महिन्यांत २६ रिक्षाचालकांवर कारवाई झाली होती. त्यामुळे रिक्षाचालक बस थांब्यावर उभे राहणे कमी झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे पथकच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पथकाने नव्या वर्षात कोणतीही कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बस थांबा व परिसर हा बसच्या प्रवाशांसाठी आहे, की रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षा उभ्या करण्यासाठी, अशी परिस्थिती दिसून येते आहे.

त्यामुळे पीएमपीच्या चालकांना थांब्यावर बस उभी करताना अडचणी येत आहेत. प्रवाशांनादेखील उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. पीएमपीचालकाने रिक्षाचालकास काही बोलल्यास वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. तरीही संबंधित पथकाकडून कारवाई केली जात नाही. सध्या हे पथक फक्त कागदावरच असून, ते कधी सुरू केले जाणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
कॅबचालकांचा कोंडमारा! परिवहन विभाग, ‘अ‍ॅप’ कंपन्यांच्या वादात उपजीविकेचा प्रश्न गंभीर
असे आहे पथक

पीएमपीच्या वाहतूक विभागाचे एक अधिकारी व दोन कर्मचारी हे या पथकामध्ये तैनात करण्यात आले होते. या पथकाच्या मदतीने वाहतूक शाखेचा व प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) अधिकारी मदतीला असतो. सध्या हे पथक कागदावरच कार्यरत आहे. हे पथक पुन्हा कार्यान्वित करून त्याद्वारे कारवाई करण्याची गरज आहे.

बीआरटी व इतर थांब्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या दक्षता पथकाचे काम प्रभावीपणे सुरू आहे. थांब्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाईसाठी तयार केलेल्या पथकाला पुन्हा सक्रिय करून प्रभावीपणे कारवाई केली जाईल.- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, पीएमपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed