• Mon. Nov 25th, 2024

    वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव

    वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव

    म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

    आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने सुमारे दहा कोटी ७२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून, या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. सध्या वैजापूर तालुक्यात २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, आणखी सात गावांनी टँकरची मागणी केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे किरण पोपळघट यांनी दिली.

    तालुक्यातील बोरदहेगाव, सटाणा, भटाणा, कोल्ही, गाढेपिंपळगावसह लघु व मध्यम प्रकल्पही कोरडेठाक आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

    जानेवारी ते मार्च या कालवधीत ५४ गावांतील ७८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यातून ५४ गावांना ७७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील पोखरी, वाकला येथील नळ योजना विशेष दुरुस्ती, साकेगाव, मनेगाव व पानवी (बु.) येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    या तीन महिन्यांच्या काळासाठी आठ कोटी सात लाख २४ हजार रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाईची समस्या गृहित धरून या काळात ३६ गावांतील ५१ खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. तसेच ३६ गावांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी ६४ लक्ष ९६ हजार रुपयांचा खर्च अंदाजित आहे. जानेवारी ते जून २०२४ या पूर्ण कालावधीत तालुक्यातील ९० गावांना १२८ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा आराखडा करण्यात आला आहे.
    मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; १०० प्रकल्प कोरडे, टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
    टुणकी दसकुली, पेंडेफळ, अंचलगाव, शहजतपूर, सावखेडखंडाळा, कनकसागज, बाभूळतेल, तिडी, अगरसायगाव, जिरी मनोली, लोणी खुर्द व माळीसागज येथे प्रत्येकी एक, लोणी (बु.), शिवराई, आघूर व भगूर येथे प्रत्येकी दोन तर वाकला येथे तीन असे एकूण २३ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी कार्यालयात सात, तहसील कार्यालयात चार व भूवैज्ञानिक यांच्याकडे १२ गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आहेत.

    शहराला चार दिवसांआड पाणी

    वैजापूर येथील नारंगी मध्यम प्रकल्पातील जलसाठा संपला आहे. याशिवाय भोयगाव (ता. कोपरगाव) येथील साठवण तलावात १५ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *