• Tue. Mar 10th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar News : ‘समृद्धी’वर जेवणाची सुट्टी ठरली शेवटचीच; सावलीत बसलेल्या 3 कामगारांचा करुण अंत

    समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या बाजूला सावलीत जेवण करण्यासाठी बसलेल्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने चिरडलं. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर आज एक अशी हृदयद्रावक घटना घडली, ज्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. भररस्त्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणाऱ्या तीन मजुरांवर काळाने घाला घातला. दुपारच्या कडक उन्हात जेवणासाठी वाहनाच्या सावलीत बसलेल्या पाच कामगारांना एका भरधाव ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण मृत्यूशी झुंज देत आहेत.

    करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपूर शिवारात मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे पाच कामगार सीसीटीव्ही बसवण्याचे आणि लोखंडी बॅरेलच्या दुरुस्तीचे काम करत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे कामगार जेवण करण्यासाठी थांबले. कडक उन्हामुळे त्यांनी जवळच उभ्या असलेल्या कंपनीच्या सर्विस ट्रक आणि जेसीबीच्यामध्ये असलेल्या सावलीचा आधार घेतला. सुरक्षेचा नियम पाळत त्यांनी आजूबाजूला सेफ्टी बॅरिकेट्सही लावले होते, मात्र नशिबाने घात केला. हे पाचही जण जेवणाचे डबे उघडून बसलेले असतानाच, जालन्याकडून नागपूरच्या दिशेने लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या एका ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
    Maharashtra TimesMaharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थसंकल्पाची A टू Z माहिती, शेतकरी कर्जमाफी ते मुंबई-पुण्यासाठी काय-काय घोषणा?
    धडक इतकी प्रचंड होती की, उभा असलेला ट्रक थेट खाली बसलेल्या कामगारांच्या अंगावर चढला आणि त्यांना चिरडत समोरच्या जेसीबीवर जाऊन आदळला. अपघातग्रस्त ट्रकने या दोन्ही वाहनांना आणि खाली दबलेल्या मजुरांना काही अंतरापर्यंत फरपटत नेले. या भीषण घर्षणामुळे तिघांचा जागीच अंत झाला.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : ‘विकासाचं मृगजळ दाखवणारा, कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प’, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका

    जेवणाचे डबे रक्ताने माखले

    काही क्षणांपूर्वी एकमेकांशी गप्पा मारत जेवण करणाऱ्या या कामगारांचे जेवणाचे डबे रक्ताने माखले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गंभीर जखमी असलेल्या दोन कामगारांना तात्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग आणि चालकांचा निष्काळजीपणा निष्पाप जीवांच्या जीवावर उठत आहे. सीसीटीव्ही लावून हा मार्ग हायटेक आणि सुरक्षित करणाऱ्या कामगारांचाच अशा प्रकारे बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा