• Mon. Nov 25th, 2024
    होळीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी, २००० पेक्षा जास्त फौजफाटा तैनात

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याने भरलेले फुगे मारणाऱ्यांवरही पोलिस लक्ष ठेऊन असणार आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धूलिवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.
    बंद पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली, वडिलांसमोर लेकाने जीव गमावला, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
    येत्या रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केला जात जातात. हे सण साजरे होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत फौजफाटा तयार ठेवला आहे. आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत पोलिसांचा सर्वत्र कडक बंदोबस्त असणार आहे. केमिकलयुक्त फुगे मारणाऱ्यांवरही पोलिस करडी नजर ठेऊन आहेत. एखादी तक्रार आल्यानंतर त्वरीत कारवाई केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

    लोकल प्रवाशांची सुरक्षिततेसाठी…


    धावत्या लोकलवर पाण्याने भरलेला फुगा फेकल्यास प्रवासी गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोहमार्ग पोलिसांनी आवश्यक पाऊले उचलली आहेत. सर्व लोहमार्ग पोलिस ठाण्यांना अलर्ट राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्येही विशेष जनजजागृती करण्यावर भर दिला आहे. जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. लोकलवर फुगा मारल्याने प्रवाशाचा जीव धोक्यात सापडू शकतो. तसेच, कायमचे अपगंत्व येऊ शकते, याबाबत रहिवाशाना समजावून सांगण्याविषयी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

    वाहतूक पोलिसांची सज्जता

    दारू पिऊन वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवार, २३ मार्चपासून संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई २५ मार्चपर्यंत चालू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ अॅनालयाझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे राठोड यांनी सांगितले. त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. या कारवाईसाठी ६३ पोलिस अधिकारी आणि ६५० कर्मचारी तैनात असतील, असेही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed