• Sat. Sep 21st, 2024

नाशिक, शिर्डी मनसेला? नाशिकच्या जागेबाबत नवा ट्विस्ट, भाजपसह शिंदे सेनेत अस्वस्थता

नाशिक, शिर्डी मनसेला? नाशिकच्या जागेबाबत नवा ट्विस्ट, भाजपसह शिंदे सेनेत अस्वस्थता

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे लोकसभा निवडणुका लढणार हे निश्चित झाले आहे. मनसेने भाजपकडे तीन जागांचा प्रस्ताव ठेवला असून, त्यात नाशिकचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आधीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच, तिसऱ्या भिडूच्या एंट्रीने महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी आणि नाशिकची जागा मनसेला गेल्यास नाशिक आणि शिर्डीत शिंदे सेनेसह भाजपमध्ये मोठ्या उलथापालथी घडण्याची शक्यता आहे.

भाजपने राज्यातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विभागणी झाल्याने विरोधकांची ताकद कमी झाल्याचे मानले जात असले तरी भाजपने केलेल्या सर्वेक्षणात मविआचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे भाजपने आता उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून महायुतीत राज ठाकरेंना आणण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात परतल्यानंतर ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी गुरुवारी (दि. २१) राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला असून, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरेंनी भाजपकडे नाशिक, शिर्डी आणि मुंबईतील एक अशा तीन जागांचा प्रस्ताव दिला असून, भाजप दोन जागा राज ठाकरेंना देण्याची शक्यता आहे. नाशिक हा मनसेचा गड असून, ही जागा मागितल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिर्डीवरदेखील मनसेचा दावा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे सेनेतील दोन्ही जागांवर मनसेने दावा ठोकल्याने शिंदे सेनेत अस्वस्थतेचे वारे वाहू लागले आहेत.
भाजपचा आग्रह, शिंदे गटही ठाम; नाशिक लोकसभेवरुन महायुतीतील संघर्ष टोकाला
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ?

नाशिक लोकसभेसाठी भाजपकडून अनेक इच्छुक आहेत. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात आधीच नाशिकच्या जागेवरून ओढाताण असताना, ही जागा मनसेला गेल्यास दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था होणार आहे. शिर्डीची जागाही शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिंदे गटाच्या जागांवरच दावा ठोकल्याने भाजपपेक्षा शिंदे गटाला झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट या जागा मनसेला सोडणार काय, यावरदेखील प्रश्नचिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed