• Sat. Sep 21st, 2024

होऊ द्या खर्च! उमेदवारीपूर्वीचा खर्च पक्षाच्या खात्यात, अर्ज भरल्यानंतरचा खर्चही गणला जाणार

होऊ द्या खर्च! उमेदवारीपूर्वीचा खर्च पक्षाच्या खात्यात, अर्ज भरल्यानंतरचा खर्चही गणला जाणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एखाद्या पक्षाच्या उमेदवाराने प्रचार सुरू केल्यास त्याबाबतचा खर्च संबंधित पक्षाच्या खात्यावर नोंद केला जाणार आहे. ज्या गोष्टींसाठी परवानग्या घेणे आवश्यक आहे असा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीचा सर्व खर्च पक्षांच्या नावे असेल.

राजकीय पक्षाचा उमेदवार नसलेली व्यक्ती अर्ज भरण्यापूर्वी व्यक्तिगत स्तरावर प्रचार करीत असेल, तर त्याचा खर्च सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, उर्वरित राजकीय पक्षांनी अद्याप नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यंदा निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीत ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. होणाऱ्या खर्चाचा तपशील रोजच्या रोज निवडणूक शाखेकडे विहित नमुन्यात सादर करणेही बंधनकारक असणार आहे. परंतु, राजकीय पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होणारा खर्च संबंधित ९५ लाख रुपयांच्या मर्यादेत गणला जाणार आहे. यातही प्रचार रॅली, चौकसभा, स्टार प्रचारकांच्या सभा, ध्वज लावणे, जाहिरातबाजी, वाहनांद्वारे मतदारसंघात प्रचार यासाठी संबंधित यंत्रणांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. ज्या प्रचाराबाबत परवानगी घेणे बंधनकारक आहे तोच खर्च निवडणूक खर्चात गणला जाणार आहे. परंतु, दारोदारी जाऊन प्रचार करण्यास परवानगीची आवश्यकता नसल्याने हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यात २ लाख ‘पोस्टल’ मतदार; कर्मचारी, वृद्ध, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची संधी
कार्यकर्त्यांवर ‘होऊ दे खर्च’

आचारसंहिता जाहीर झाल्यापासून मतमोजणीपर्यंतचा काळ जवळपास ८० दिवसांचा आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदानापर्यंतचा काळ सुमारे दोन महिन्यांचा आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून खर्च गणला जाणार असला, तरी अनेक उमेदवारांनी आतापासूनच व्यक्तिगत स्तरावर प्रचारही सुरू केला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा याकरिता त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा खर्च रोजच्या रोज उमेदवारांकडून होत आहे. संबंधित उमेदवाराची राजकीय पक्षाकडून उमेदवारी निश्चित असेल, तर हा खर्च उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संबंधित पक्षाच्या खात्यात गणला जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर मात्र मतदानाच्या दिवसापर्यंतचा प्रत्येक खर्च हा संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये गणला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीपर्यंत उमेदवाराकडून होणारा खर्च संबंधित पक्षाच्या खात्यावर वर्ग केला जाईल. अर्ज दाखलनंतरचा खर्च उमेदवाराच्या खात्यात गणला जाईल. प्रचाराशी संबंधित ज्या गोष्टींसाठी परवानगीची आवश्यकता आहे असा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट होईल. राजकीय पक्षांना खर्चाची मर्यादा नाही.-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed