• Sat. Sep 21st, 2024
रक्षा खडसेंसह स्मिता वाघ यांनाही पक्षातंर्गत विरोधाचा फटका, जळगावात चित्र बदलणार?

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करीत भाजपाने आघाडी घेतली आहे. मात्र, रावेर तालुक्यातील उमेदवार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर यावल, रावेर व बोदवड तालुक्यातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. जळगावातून स्मिता वाघ यांना पदाधिकाऱ्यांना जळगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्याने या दोन्ही उमेदवारांना प्रचारासह पक्षांतर्गत विरोधाचे आव्हान पेलावे लागणार आहे.भाजपाने जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारीची संधी दिली आहे. मात्र, मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यावल, रावेर व बोदवड तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांन अमोल जावळे यांच्याकडे सामुहिक राजीनामे सादर केले आहेत. त्याचबरोबर मुक्ताईनगरचे महायुतीतीलच शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मी अपक्ष आमदार असल्याने मला काय करायचे हे बंधनकारक नसल्याचे म्हणत त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार करायचा की नाही परिस्थिती पाहून ठरवण्याचा इशाराच दिला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नसल्याने त्यांना प्रचारासह त्यांना या अंतर्गत विरोधाचे आव्हान पेलावे लागणार आहे.

स्मिता वाघ यांच्यावरही छुप्या विरोधाचे सावटदरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून भाजपाने माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. तिकीट कापले असले तरी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वाघ यांचा प्रचार करणार असल्याचे उन्मेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पट्ट्यातील ८ ते १० गावातील शेतकऱ्यांनी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत पुन्हा उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यासह चाळीसगाव व इतर काही तालुक्यांमधून देखील स्मिता वाघ यांना छुपा विरोध होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा विरोध मोडून काढत प्रचाराची धुरा मजबूतपणे सांभाळण्याचे आव्हान स्मिता वाघ यांनाही पेलावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed