चंद्रपूर : उन्हाळा म्हटलं की चंद्रपूरातील लाही लाही करणारं उन डोळ्यासमोर येतं. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीठीने बळीराजाला मोठा फटका बसला आहे. अनेक भागात गारांचा पाऊस कोसळला. कोरडे पडलेले नाले वाहू लागले आहेत. रस्त्यावर अक्षरश: गारांचा सडा पडला आहे. अद्याप नुकसानीचा आकडा समोर आलेला नाही. मात्र, मक्का, गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज (मंगळवार) पुन्हा पावसाने जिल्ह्याला झोडापून काढले. विजांच्या कडकडासह वादळी पाऊस झाला. वरोरा तालुक्यातील माढेळी गावात अक्षरशः गारांचा पाऊस पडला. कोरपना तालुक्यात हीच स्थिती बघायला मिळाली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली गावात झाडे कोसळली. तोहोगाव येथील नाला वाहू लागला. जिल्ह्यातील शेतशिवारात मिर्ची, मका, ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिक उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्याप नुकसानीचा आकडा पुढे आलेला नाही. मात्र अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि अचानक झालेली गारपिटीने मंगळवारी नागपूर शहराला झोडपून काढले. ग्रामीण भागातील गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे कळते. मंगळवारी संध्याकाळी आलेल्या या वादळी पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि अचानक झालेली गारपिटीने मंगळवारी नागपूर शहराला झोडपून काढले. ग्रामीण भागातील गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे कळते. मंगळवारी संध्याकाळी आलेल्या या वादळी पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या १० दिवसांतील ही दुसरी गारपीट आहे. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, संध्याकाळी चारनंतर शहरातील आकाशात ढग दाटून आले. पाचनंतर अनेक भागांमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली. सुमारे १० ते १५ मिनिटे चाललेला हा वादळी पाऊस चांगलाच जोरदार होता. शहर व ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. काही भागांत नुकसान झाले असले तरी कुठेही जीवितहानी झाली नाही. अनेक भागांत वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, ती लवकरच पूर्ववत झाली. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कामाला लागले होते. -हवामान खात्याने बुधवारीसुद्धा यलो अलर्ट दिला असून वादळी पावसाचा इशारा दिला आहे.