• Sat. Sep 21st, 2024

अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp  स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर नेत्यांनी रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा,अशी सूचना केली होती.त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेत्यांची चर्चा करून निर्णय घेईन,असे सांगितले.

यावरून माढा मतदारसंघातील तिढा सुटला,अशी अफवा काहींनी माढा मतदारसंघात पसरवली होती. त्यावर रामराजेंनी Whatsapp स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे म्हटले आहे.त्यामुळे माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या Whatsapp स्टेटसवरून स्पष्ट झाले आहे.

माढा मतदारसंघाबाबत महायुतीत निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी मुंबई येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळी भूमिका घेऊन विरोध केला आहे. त्यामुळे आज तातडीने मुंबई येथे रामराजेंची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. महायुतीचा धर्म पाळावा, या फडणवीसांच्या सूचनेला रामराजेंनी विरोध करत मतदारसंघातील समविचारी नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन, असे सांगितले. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर झाल्यापासून निर्माण झालेला माढ्याचा तिढा बैठकीनंतरही कायम राहिला.

रविवारी रामराजे नाईक -निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माढा मतदारसंघात महायुतीतच वाद पेटला होता. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला. पण, रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले होते. त्यामुळे हा वाद शमविण्यासाठी आज तातडीनं महायुतीतील नेत्यांची बैठक घेण्यात आली होती.

सध्या माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी या उमेदवारीवरून नवीन पेच निर्माण झाला आहे.फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे.तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे,तर दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्यास सुरवात केली होती.काल माढा लोकसभा अनुषंगाने महायुतीची बैठक टेंभूर्णी येथे संपन्न झाली होती.यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे, माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, उत्तमराव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed