• Mon. Nov 25th, 2024
    पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे सावट! पाण्याचा वापर जपून करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.

    या संदर्भात पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी आवाहन पत्र जाहीर केले. त्यात म्हटले आहे, की उन्हाळा सुरू झाला आहे. आगामी पावसाळा जूनमध्ये सुरू होण्याची शाश्वती नाही. पावसाला विलंब झाल्यास शहरात पाणीटंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळावा. पाण्याची उधळपट्टी थांबवावी.
    अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला विलंब, नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत एक कोटी १० लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण
    सिंह म्हणाले, ‘पिण्याचे पाणी घरगुती वापरासाठी योग्यरीत्या वापरावे. पाणी शिळे होत नाही. त्यामुळे शिल्लक पाणी फेकून न देता त्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यांसाठी, घर/इमारत परिसर स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वापर करू नये. सर्व सोसायटीधारकांनी एसटीपी व बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांमध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता करण्यासाठी वापरावे.’

    पाणी जीवन असल्याचे नमूद करून सिंह म्हणाले, ‘पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास बचत होणार आहे. किमान जून किंवा जुलैपर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल. पाणीटंचाईचे संकट ओढवून न घेता यंदाचा उन्हाळा सुसह्य होईल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.’

    आवाहनातील प्रमुख मुद्दे

    – वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी नको.

    – अंगण, जिने, फरशी धुणे टाळा.

    – घरातील गळणारे नळ दुरुस्त करा.

    – घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नका.

    – बागकामासाठी पिण्याचे पाणी नको.

    प्रशासनाचा इशारा

    पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आढळल्यास म्हणजेच गाड्या धुणे, रस्ता धुणे, घर किंवा सोसायटी परिसर धुणे यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्राहकांना गैरवापराबाबत नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. तत्काळ नळजोड तोडण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *