• Sat. Sep 21st, 2024

तीन दिवसांत कर भरा, अन्यथा कारवाई! मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा इशारा

तीन दिवसांत कर भरा, अन्यथा कारवाई! मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा इशारा

मुंबई : मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना पालिकेने कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. थकबाकी भरा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशाराच पालिकेने दिला आहे.मालमत्ता कर हा मुंबई पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कारवाई होते. मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरणाऱ्यांची यादी वाढतच आहे. या कालावधीत दोन ते अडीच हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. ही रक्कम दोन हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. यादीतील पहिल्या १०० थकबाकीदारांची रक्कमच १ हजार ३०० कोटी रुपये आहे.

निवासी, औद्योगिक, वाणिज्य, खुली जागा अशा विविध वर्गवारींतर्गत हे थकबाकीदार आहेत. मालमत्ता करवसुलीच्या दृष्टीने अशा थकबाकीदारांवर मुंबई पालिकेकडून कारवाई केली जात आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने या थकबाकीदारांना पत्र पाठवले असून, कोणतेही कारण न देता तीन दिवसांत कर भरण्याचे आवाहन केले आहे. करभरणा न केल्यास मुंबई महापालिका कायदा १८८८ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. त्यात दंड आकारण्यापासून मालमत्ता जप्ती आणि त्याचा लिलाव करण्याच्या कारवाईचा समावेश आहे.
मालमत्ता कर थकवलेल्यांवर कारवाईचा बडगा; दहा जणांनी थकवले १४७ कोटी रुपये, यादी जाहीर
करवसुली उद्दिष्टापासून पालिका दूरच

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता करवसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पालिकेने २०२३-२४ मालमत्ता करदेयक ऑनलाइन उपलब्ध करून दिले असून, ती ई-मेलद्वारेही पाठवली जात आहेत. एकूण ९ लाख २२ हजार देयके पाठवण्यात आली आहेत. थकबाकीपोटी पालिकेच्या तिजोरीत आधीच ७०२ कोटी रुपये जमा झाले होते. २६ फेब्रुवारीपासून नवीन देयके पाठवल्यापासून ते आत्तापर्यंत त्यात आणखी ७५० कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed