• Sat. Sep 21st, 2024

एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता आलेलं नाही. सत्ताधारी युती आणि विरोधातील आघाडी, दोन्हीकडे जागावाटपाचा तिढा कायम आहे.

महायुतीचं जागावाटप पुढच्या २४ तासांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला सर्वाधिक ३०, शिंदेंच्या सेनेला ११ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ७ जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे भाजपनं शिंदेंच्या काही जागांवर दावा सांगितला आहे. विदर्भातील रामटेक मतदारसंघ भाजपला सोडा, अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कालच केली आहे.
अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने पक्षफुटीनंतर शिंदेंसोबत गेले. त्यांची जागा भाजपला दिल्यास शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. शिंदेंना त्यांच्या विद्यमान खासदाराची जागा वाचवता आली नाही, असा मेसेज यामुळे जाईल. त्यामुळे रामटेकची जागा आपल्यालाच मिळेल यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत. रामटेकची जागा वाचवण्यासाठी शिंदे हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
दुसरीकडे उद्धव ठाकरेदेखील रामटेकमुळे अडचणीत आले आहेत. युती-आघाडीच्या राजकारणात या जागेवर २०१९ पर्यंत सेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष झाला. तुमाने यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये इथे काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. पण तुमाने सध्या शिंदेंसोबत आहेत. मागील निवडणुकीत सेनेनं ही जागा जिंकल्यानं महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे रामटेकसाठी आग्रही आहेत. पण काँग्रेसनं या जागेवर दावा सांगितला आहे. ठाकरे रामटेकची जागा काँग्रेससाठी सोडतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कित्येक दशकांपासून लढवलेली जागा काँग्रेसला का सोडायची, असा त्यांचा सवाल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed