लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी पुन्हा माध्यमांमधून कथोरे आणि पाटील यांच्यात स्पर्धा सुरू होती. भाजपने देश पातळीवर जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यानंतर कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी प्रचाराबाबत चर्चा झाल्याची माहिती कपिल पाटील यांनी समाज माध्यमांना दिली आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार किसन कथोरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कथोरे यांनी त्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कथोरे आणि पाटील यांच्या भेटीने भाजपातील शीतयुद्ध संपल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा असून येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असून यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार की अन्य कुणी तिसरा उमेदवार असणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे.