• Sat. Sep 21st, 2024
चंद्रहारची छाती पाहून सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणाची हिम्मत नाही, ठाकरेंकडून तिकीटाची घोषणा

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. सांगलीतला मर्द आपल्याला दिल्लीत पाठवायचाय, त्यांच्या प्रचाराला मी सांगलीत येईनच पण आपण मला विजयी सभेला बोलवा, म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. त्याचवेळी सांगली लोकसभेच्या संघटकपदीही त्यांची निवड केली. ‘नामर्द पळपुटे आपल्या पक्षातून जात असताना चंद्रहार पाटील यांच्यासारखे तरणेबांड तरूण आपल्या पक्षात प्रवेश करतायेत, हे हुकूमशाहीच्या काळात सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण आहे’, असंही ठाकरे म्हणाले. दुसरीकडे ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सांगलीतून काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.सांगलीमधून लोकसभा लढण्याची तयारी करत असलेले चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वत: उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रहार यांच्या पक्षप्रवेशासमयी कार्यकर्त्यांनी ‘अब की बार-चंद्रहार’ अशा गगनभेदी घोषणा देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
उद्धव ठाकरेंकडून उमेदवारीचा शब्द? जयंतरावांचा शिलेदार शिवबंधन बांधणार, मातोश्रीवर प्रवेश

शेतकऱ्याच्या मुलाला आपण एवढा सन्मान दिलात

पक्षप्रवेशानंतर चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली लोकसभेच्या दृष्टीने एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण एवढा सन्मान दिलात, त्याबद्दल आपला आभारी आहे. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखविण्याची मला जास्त सवय आहे. सांगली लोकसभेचा पहिला निकाल आपल्या बाजूने असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एवढ्या मोठ्या परिवारात सहभागी करून घेतलं, याबद्दल त्यांनी ठाकरेंचे आभार मानले.

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, पाहा यादी!

सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणी हिम्मत करणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रहार पक्षात आल्यानंतर माझी छाती अभिमानाने फुगली. चंद्रहारची छाती पाहून आता सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणी हिम्मत करणार नाही. नामर्द पळून जातायेत पण मर्द शिवसेनेत येतायेत. आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारने आपल्या परिवारात सहभागी व्हायचा निर्णय घेतला. त्याची इच्छा होती की तुम्ही काहीतरी संकेत दिले पाहिजेत… पण लोकांनीच आता ठरवलंय म्हटल्यावर मी काय संकेत देऊ? असे म्हणताना त्यांनी सांगलीचा पैलवान दिल्लीला पाठवायचाय, असा इरादा व्यक्त करत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

कुस्तीच्या आखाड्यात डाव जिंकले, आता संसदेत जाण्याची तयारी, डबल महाराष्ट्र केसरीच्या हातात ठाकरेंची ‘मशाल’

अब की बार-चंद्रहार

अब की बार-चंद्रहार अशा केवळ घोषणा देऊन चालणार नाही तर इरादा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची आवश्यकता आहे. सांगलीत बरीच वर्ष आलो नाही. पण आता यावं लागेल. चंद्रहार यांच्या प्रचाराला मी येईनच पण मला त्यांच्या विजयी सभेला बोलवा, असेही उपस्थितांना उद्देशून ठाकरे म्हणाले. त्यावेळी चंद्रहार यांच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. लोकसभेच्या संघटकपदी चंद्रहार पाटील यांची निवड करताना पुढची वाट अधिक सोपी होईल, असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed