म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अंबड परिसरात राहणाऱ्या फेब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण करून बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीपैकी तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. या सहा मित्रांनी एकत्र येत कट रचून व्यावसायिकाचे अपहरण केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, एकाला व्यवसायात झालेला तोटा भरून काढण्यासाठी खंडणीचा ‘डाव’ आखल्याचे तपासात निष्पन्न झाले.सिडकोतील उपेंद्रनगरात राहणाऱ्या राजेश कुमार गुप्ता (वय ३९) यांनी म्हसरूळ पोलिसांत अज्ञात चार संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवला होता. त्यांना सोमवारी (दि. ४) दुपारी तीन वाजता पिस्तुलाचा धाक दाखवून बळजबरीने कारमध्ये बसवून मध्यप्रदेशात नेवून खंडणी वसूल केली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यानुसार संशयित आदित्य एकनाथ सोनवणे (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, अंबड), तुषार केवल खैरनार (२८, रा. म्हसरूळ) व अजय सुजित प्रसाद (२४, रा. अंबड) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची कार, महागडे मोबाइल, सोन्याचे दोन कानातले, २९ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शाळेत खेळता-खेळता अचानक पडला; दुसरीतील मुलाचा मृत्यू, हार्ट अटॅक की आणखी काही?पोलिस तपासातून…
– संशयित खैरनार याचाही फेब्रिकेशनचा व्यवसाय
– खैरनारला व्यवसायात मोठा आर्थिक तोटा
– तोटा भरून काढण्यासाठी खंडणीचा कट
– वेगवेगळ्या ठिकाणच्या सहा मित्रांना केले एकत्र
– बारा लाखांतून प्रत्येकी दीड लाखांचे ‘डील’
– उर्वरित पैशांत मज्जा-मस्तीचा ‘डाव’
आधी अपहरण मग जबरदस्ती सात फेरे, व्हायरल व्हिडिओनंतर मुलीचे कुटुंबीय आक्रमक
नेमकं काय घडलं?
गुप्ता यांना खिडकी बनविण्याची ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून सुयोजित परिसरात बोलावले. बळजबरीने त्यांना कारमध्ये बसवून मध्यप्रदेशाकडे नेले. दोन संशयित नाशिकमध्येच थांबले. गुप्ता यांच्या पत्नीकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी सहा लाख रुपये बँकेसह घरातून जमा केले, तर सहा लाख रुपये उसनवार घेतले. बारा लाख रुपये नाशिकमधील दोन संशयितांना मिळाले. त्यानंतर इतर चौघे गुप्ता यांना मध्यप्रदेशातील बस स्थानकावर सोडून देऊन पसार झाले. बारा लाख रुपये मिळताच संशयितांनी साडेतीन लाखांची कार खरेदी केली. काही पैसे दागिन्यांत, तर काही महागड्या मोबाइलमध्ये गुंतवले. उर्वरित पैसे कुठे खर्च केले किंवा कुठे ठेवले आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.