• Mon. Nov 25th, 2024
    छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता फक्त २ तासांत, पुणे ग्रीन फिल्ड एक्स्प्रेससाठी करार, जाणून घ्या प्रकल्प

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २३० किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्राच्या वाहतूक महामार्ग मंत्रालयात नुकताच करार झाला. त्याअंतर्गत या रस्त्याच्या उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय झाला आहे. या रस्त्यावरुन पुण्याचे अंतर दोन तासांत कापता येईल. पर्यावरणपूरक रस्ता निर्मितीचे ध्येय गाठताना दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे.

    सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्ता २३० किलोमीटरचे अंतर पार करताना मोठ्या प्रमाणावर असलेल्या वाहतुकीचा सामना करावा लागतो.

    सध्या या रस्त्यावरून ९० हजार पीसीयूची (पॅसेंजर कार युनिट) वर्दळ आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अपेक्षित वेळेत अंतर कापता येत नाही. पुणे आणि लगतची औद्योगिक वसाहत, नगर औद्योगिक वसाहत आणि छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतीचा कनेक्ट आहे. वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी दोन्ही शहरांदरम्यान ग्रीन फिल्ड कॉरिडॉर उभारण्याबाबत विचार सुरू होता. नुकत्याच नागपुरात झालेल्या करारामुळे हा रस्ता उभारणीसाठी एक पाऊल पुढे पडले आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन रस्ता छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा काही भाग, नगर आणि पुणे जिल्ह्यांतून जाईल. पुण्याजवळील रिंगरोडची जोडणीही या रस्त्याला दिली जाणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून समृद्धी महामार्गाला जोडणी दिली जाणार आहे. जेणेकरून नागपूरकरांना छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे आणखी लवकर गाठता येणार आहे. नवीन रस्ता झाल्यावर त्यावरून अंदाजे एक लाख २७ हजार ३२८ पीसीयू वाहतूक अपेक्षित आहे. हा सहा पदरी रस्ता २६८ किलोमीटरचा असेल. १२० किलोमीटर प्रतितास अंतर कापता येणे अपेक्षित आहे. प्रवेश नियंत्रित असेल. शिरुर येथे १२ किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगर जवळ आठ किलोमीटर जोडरस्ता असेल. भूसंपादनासाठी ४४३७ कोटी रुपये अपेक्षित आहेत. ७१३२ कोटी रस्ते बांधकामासाठी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन स्थापन केले असून त्यांच्या वतीने रस्त्याची निर्मिती केली जाईल, असे सूत्रांनी नमूद केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *