• Mon. Nov 25th, 2024
    रावेरमधून रक्षा खडसेंच्या नावावर प्रश्नचिन्ह, पवार गट नव्या उमेदवाराच्या शोधात, पेच वाढणार?

    निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप पक्ष विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट बदलणार असून त्या ठिकाणी अमोल हरिभाऊ जावळे किंवा केतकी उल्हास पाटील या नवीन तरुणांना भाजपा उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच्या चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या आहेत.राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून खुद्द एकनाथराव खडसे यांनीच मागील महिन्यात मीच लोकसभेचा राष्ट्रवादी पवार गटाचा दावेदार असल्याचं छाती ठोकपणे जाहीर केले होते. मात्र, राज्य सरकारने १३७ कोटींच्या गौण खनिज प्रकरणी खडसे कुटुंबाला त्यांच्या मालमत्तेव बोजा सोडवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने एकनाथ खडसेंना अनेक प्रकरणांमध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकवलेले आहे. या प्रकरणांतून सुखरूप सुटका कशी होणार हा विचार करता एकनाथ खडसे यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा देखील मतदारसंघात आहे.

    स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे २०१४ मध्ये विद्यमान खासदार असताना तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी जावळे यांची पहिल्या यादीमध्ये उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप निर्माण झाल्याने एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि जावळे यांचे तिकीट कापून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
    महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
    राष्ट्रवादी पवार गटाचे एकनाथराव खडसे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उमेदवारी करायची की नाही हे ठरवणार आहे, असं सांगितलं. खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट भाजपाने नाकारल्यास खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी पवार गटातर्फे रावेर लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

    राष्ट्रवादी पवार गटातर्फे एकनाथराव खडसे यांनी डॉक्टरांचे कारण सांगून उमेदवारी नाकारल्यास पवार गटातर्फे कुणाला उमेदवारी देणार यावर राष्ट्रवादी पवार गट चाचपणी करायला सुरुवात केली आहे. यात पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील तसेच विनोद तराळ व रमेश पाटील यांच्या नावांचा विचार राष्ट्रवादी पवार गट करू शक्यतो पण भाजपा समोर प्रबल्य उमेदवार देणे राष्ट्रवादी पवार गटाला गरजेचे आहे.

    खासदार रक्षा खडसे यांना भाजपातर्फे उमेदवारी नाकारल्यास भाजपाकडून रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हा एक तरुण चेहरा समोर येत आहे. अमोल जावळे हे स्वर्गीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र असून अमोल जावळे हे त्यावेळी राजकारणात सक्रिय नव्हते. परंतु राजकीय वारसा सुरू ठेवण्यासाठी अमोल जावळे हे वडिलांच्या निधनानंतर भाजपात सक्रिय झाले आणि त्यांना रावेर विधानसभा प्रमुख तसेच रावेर पूर्वचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरा चेहरा जो आहे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. केतकी पाटील या अनेक महिन्यांपासून रावेर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत, भाजप आम्हालाच उमेदवारी देणार या आशेवर त्यांनी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

    जर जळगाव लोकसभेत भाजपातर्फे महिला उमेदवार दिल्यास रावेर लोकसभेत पुरुष उमेदवारी राहील. जर रावेर लोकसभेत महिलेला उमेदवारी दिल्यास जळगाव लोकसभेत पुरुष उमेदवार राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभेत भाजपच्या वरिष्ठां ष्टांमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *