• Mon. Nov 25th, 2024

    पाणीटंचाईच्या झळा, नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे वाड्या-वस्त्यांसाठी पावणेदोनशे टॅंकर

    पाणीटंचाईच्या झळा, नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे वाड्या-वस्त्यांसाठी पावणेदोनशे टॅंकर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात यंदा अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत निम्माच पाऊस पडल्याने मार्चपासूनच ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही उन्हाळी हंगामात आवर्तनांचा अंदाज यंदा चुकणार असल्याची धास्ती बळीराजाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडूनही टँकर पुरवठ्याद्वारे या झळा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत सुमारे ५५९ गावे आणि वाड्यांमध्ये शासकीय व खासगी टँकर मिळून सुमारे १७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. तर तब्बल ५२ विहिरींचे अधिग्रहणदेखील करण्यात आले आहे.

    गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच मान्सूनने दडी मारली. नंतरहून झालेल्या पावसानेही म्हणावा असा प्रभाव दाखविला नाही. सरासरीच्या तुलनेत केवळ ५८ टक्के इतकीच पावसाची नोंद यंदा जिल्ह्यात करण्यात आली. दरम्यानच्या काळात दुष्काळसदृश वातावरण राहिल्याने यंदा जानेवारी संपताच जिल्ह्यातील काही भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात विशेषत: नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड, देवळा आणि बागलाण या तालुक्यांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. मार्चच्या सुरुवातीला जिल्ह्यातील ५५९ ठिकाणांपैकी १७४ गावे आणि ३८५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने १० तर इतर माध्यमातून १६० असे एकूण १७० टँकर कार्यरत आहेत.

    ५७ विहिरींचे अधिग्रहण

    जिल्ह्यात एकूण ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गावांसाठी ८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरसाठी ४९ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर या गावांना पाणी पुरवठ्यासाठी ३५९ फेऱ्याही मंजूर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या एकही टँकर नाही.

    तालुका ——–टँकरची गरज असणारी गावे-वाड्या——–एकूण टँकर
    नांदगाव ——–२६९ ——————————–४९
    मालेगाव ——–६६ ——————————–२३
    येवला ——–५९ ——————————–३५
    चांदवड ——–५४ ——————————–२२
    देवळा ——–४७ ——————————–१४
    सिन्नर ——–४१——————————–०९
    बागलाण ——–२३ ——————————–१८
    एकूण ——–५५९ ————————-१७०
    गरीब महिलांना ‘सरकारी साडी’, आवडीच्या रंगासाठी महिला लाभार्थ्यांचा हट्ट, रेशन दुकानदारांना डोकेदुखी
    आवर्तनाचा भरवसा नकोच!

    उन्हाळी हंगामासाठी जलाशयाच्या पाण्यातील संभाव्य आवर्तनाच्या भरवशावर राहून पिकांचे नियोजन करू नये. पाण्याचा अगोदर अंदाज घ्यावा आणि नंतरच उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. जायकवाडी जलाशयासाठी समन्यायी कायद्यानुसार दारणा प्रकल्प समूहातून २३१० दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचे पाणी दि. २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात आले आहे. यामुळे या जलाशयातील पाणीसाठे कमी झाले. जलसंपदा विभागाकडून दारणा धरणसमूहातील दारणासह मुकणे, वालदेवी, वाकी, भाम व भावली प्रकल्पांसाठी उन्हाळी हंगाम २०२३-२४ साठी सिंचनाच्या नियोजनासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दारणा समूहातील दारणा, गोदावरी व वालदेवी नदीवरील उपसा लाभधारकांनी आणि शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगाम २०२४ मध्ये कोणतीही पिके जलाशयाच्या पाण्यावर विसंबून घेऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *