म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:स्टेट बँकेच्या भांडुप येथील शाखेमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना घडली आहे. बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतील तीन कोटी रुपये किमतीच्या सुमारे चार किलो सोन्यावर डल्ला मारल्याचे समोर आले. हा प्रकार उघडकीस येताच या प्रकरणात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार फरीद शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली.स्टेट बँकेच्या मुलुंड पश्चिमेला असलेल्या शाखेतून सोन्यावर सुमारे एक कोटी ९४ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जदारांनी या बदल्यात गहाण ठेवलेले सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. या लॉकरला दोन चाव्या असून त्यातील एक सर्व्हिस मॅनेजर असलेल्या मनोज म्हस्के याच्याकडे होती, तर दुसरी चावी कॅशिअरकडे असते. दोन्ही चाव्या लावल्यानंतरच लॉकर उघडायचे. २७ फेब्रुवारी रोजी म्हस्के सुट्टीवर असताना व्यवस्थापक अमित कुमार यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी लॉकर उघडले. लॉकरमध्ये दागिन्यांच्या ६३ पाकिटांपैकी केवळ चार पाकिटे होती. अन्य पाकिटे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता, म्हस्के याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर सात दिवसांत हे सोने पुन्हा लॉकरमध्ये ठेवतो, असे आश्वासन दिले.
लॉकरमध्ये चोरलेले सोने म्हस्के याने गहाण ठेवल्याचे आणि विकल्याचे समोर आले. सात दिवसांत सोने पुन्हा जमा न केल्याने कुमार यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने चोरीला गेल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत टेकवडे यांच्यासह कासार, कोळी, कचरे, आटपाडकर, जगताप यांच्या पथकाने तपास करीत आधी मनोज म्हस्के आणि नंतर त्याला सोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा फरीद शेख याला अटक केली.