काय प्रकार?
राज्य सरकारच्या वतीने अंगणवाडीत येणाऱ्या मुलांच्या पोषण आहारासाठी पालकांना दर महिन्याला धान्याची पाकिटे पुरवली जातात. यामध्ये गहू, डाळी, मीठ यांचा समावेश असतो. येरवडा जय जवाननगरमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १११ क्रमांकाची अंगणवाडी आहे. अंगणवाडीत परिसरातील वीस ते पंचवीस लहान मुले येतात. अंगणवाडीतील मुलांना धान्य वाटप करताना काही महिन्यांपासून पोषण आहाराच्या नावाखाली कीड लागलेले निकृष्ट दर्जाचे धान्याचे वाटप होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलीचे पालक विशाल शेलार यांना धान्याच्या दर्जावर संशय आला. त्यांनी ‘आप’चे पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन सरप्राइज भेट देऊन धान्याची पाहणी केल्यावर हरभरा आणि डाळीला कीड लागली होती. या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.पुणे शहर संघटक सहमंत्री मनोज शेट्टी, शहर उपाध्यक्ष महिला आघाडी श्रद्धा शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते उपस्थित होते.
‘आप’चे पदाधिकारी मनोज शेट्टी म्हणाले, ‘धान्याला कीड लागल्याचे माहिती असूनही ठेकेदाराने संपूर्ण शहरात निकृष्ट दर्जाचा मालाचा पुरवठा करून मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. एकात्मिक बाल विकास विभागाच्या आशीर्वादामुळे अंगणवाड्याना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा करण्याची मजल ठेकेदार करू शकतो. त्यामुळे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा, कंत्राटदराचे कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे.’
याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी (उत्तर) मनीषा बिरारीस यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, ‘या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांना माहिती देऊन निकृष्ट दर्जाचे धान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.तसेच धान्याचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने कीड लागलेले धान्य दिल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस करणार आहे.’
मुलांच्या जीवाशी खेळ
अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली फेकण्याच्या दर्जाचे किंवा जनावरांना खाद्य म्हणून देणारे कीड लागलेल्या डाळी वितरण करून ठेकेदार मुले आणि त्यांच्या पालकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.निकृष्ट दर्जाच्या धान्य पुरवठ्यातून अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असावा असा आरोप व्यक्त करून पालकांनी संताप व्यक्त केला. तसेच, अंगणवाडी सेविकांना धारेवर धरले आहे.विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार कीड लागलेल्या धान्याचा पुरवठा करत असणार,असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.