• Mon. Nov 25th, 2024

    राष्ट्रवादी फुंकणार ‘तुतारी’; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर

    राष्ट्रवादी फुंकणार ‘तुतारी’; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. पवार यांनी दिंडोरीवर लक्ष केंद्रित केले असून, येत्या १३ तारखेस निफाडमध्ये त्यांच्या जाहीर सभेद्वारे राष्ट्रवादी लोकसभेच्या रणातील तुतारी फुंकणार आहे.

    या सभेसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी दिली. दिंडोरीत उमेदवार निश्चित नसला, तरी पवार आपल्या हक्काच्या मतदारसंघातून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून, या निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारावर जोर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेऊन भाजपने नाशिक जिल्ह्यातील प्रचाराचा नारळ आधीच फोडला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी श्रीकाळारामाचे दर्शन घेऊन राज्य अधिवेशन यशस्वी केले. त्यानंतर ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरेही दि. ७ ते ९ मार्चदरम्यान नाशिकमध्ये लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यानंतर आता शरद पवारांची तोफही नाशिक जिल्ह्यात धडाडणार आहे. राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतरचा सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणून शरद पवार नेहमीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नाव घेतात. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नसले, तरी दिंडोरी हा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यांनी त्याआधीच दावा ठोकत येथील प्रचाराचा मुहूर्तही निश्चित केला आहे. येत्या १३ तारखेला शरद पवार यांची पहिली जाहीर सभा निफाड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, तसेच कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
    महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय?
    भुजबळ, भाजप निशाण्यावर

    सध्या दिंडोरी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर स्वपक्षासह महाआघाडीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यात कांदा निर्यातबंदी, द्राक्ष उत्पादकांची परवड, दुष्काळामुळे या भागातील शेतकरी आधीच त्रस्त असून, त्यांच्या अन्यायाला पवारांकडून वाचा फोडली जाणार आहे. भाजपसोबतच राष्ट्रवादीतील बंडात महत्त्वाची भूमिका निभावणारे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचाही मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघात आहे. त्यामुळे पवारांकडून एकाच वेळी भाजपसह भुजबळांनाही निशाण्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या सभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *