• Sat. Sep 21st, 2024
कॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: महाविद्यालयातील आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. मित्र मैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला आतला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी हिंगणा मार्गावर घडली. मित्रासोबत दुचाकीने जात असताना ओढणी चाकात अडकून ती खाली पडली. त्याच दरम्यान मागून येत असलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने २१ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला.

रितिका रामचंद्र निनावे (रा. फ्रेंड्स कॉलनी) असे मृत युवतीचे नाव आहे. रितिका वायसीसी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या अंतिम वर्षाला शिकत होती. पारंपरिक वेशभूषेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मित्र नयन वाढयी याच्यासोबत ती घरी जायला निघाली. बुलेट गाडीने (गाडी क्रमांक एमएच २९ बीक्यू १०१०) वानाडोंगरीकडून शहराकडे येत असताना सायंकाळी ६.३० च्या सुमारास हिंगणा मार्गावरील सरोदी मोहल्ला समोर गाडी आल्यानंतर तिची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने ती खाली पडली. त्याच वेळी मागच्या बाजूने येत असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, असे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले. पार्थिव शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच रितिकाचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. रितिकाच्या जाण्याने तिच्या संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवारांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर काही काळ हिंगणा मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed