म.टा. प्रतिनिधी, नागपूर: चांदमारी भवानी मंदिराजवळ पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्या. पोलिसांना बघून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशीनंतर या युवकांनी चार घरफोड्या केल्याची कबुली दिली.मानव ऊर्फ मण्या शेवारे (वय २०, रा. हिवरीनगर), कुणाल ऊर्फ भुऱ्या वानखेडे (वय १८, वर्षे, रा. वाठोडा) या दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी आपला साथीदार सूरज चौबे (वय २१, रा. हिंगणा) याच्या मदतीने घरफोड्या करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून दुचाकी, लॅपटॉप, कीपॅड, चार्जर, माउस, तीन पेनड्राइव्ह, तांब्याची तार, दोन मोबाइल असा एकूण ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या आरोपींनी वाठोडा, हुडकेश्वर, नंदनवन या भागांतही घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. नरेंद्रनगर येथील अंकित माहेश्वरी यांच्या कार्यालयातूनही साडेसतरा हजार रुपयांचे साहित्य चोरी झाले होते. बेलतरोडी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. साहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब संदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पुरुषोत्तम जगनाडे, यवानंद कडू, नरेंद्र बांते, सतीश ठाकरे, सुनील ठवकर, चेतन पाटील आदींनी ही कारवाई केली.