• Sat. Sep 21st, 2024
समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला, मासेमारी करणारी बोट अडकली; अडकलेल्यांची सुखरूप सुटका

पालघर : समुद्रात कृत्रिम पद्धतीने भित्तिका तयार करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी एक बोट समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने भित्तीका तयार करणारी ही बोट सातपाटी पूर्वेकडे समुद्रात अडकली. त्यानंतर स्थानिक मच्छीमार व पोलिसांच्या मदतीने समुद्रात बोटीत अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली.अवैध मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती लोप पावले असून मत्स्य संवर्धनासाठी माशांना प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून खाडी मुखाच्या जवळपास कृत्रिम परिस्थिती व्हावी यासाठी समुद्र तळावर कृत्रिम भित्तिका सोडण्यात येत आहेत. अनुषंगाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्याच्या यापूर्वी अभ्यासलेल्या ठिकाणी कृत्रिम भित्तिका समुद्रतळावर सोडण्याची योजना आहे. समुद्राच्या तळाशी भित्तिका उभारण्याचे काम पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत कोकण किनारपट्टीवर सुरू झाले आहे. समुद्राच्या तळाशी २० मीटर खोलीवर २ हजार स्क्वेअर मीटरच्या भित्तीका उभारण्याचे काम करण्यात येत आहेत. जुने टायर, जुन्या बोटी एखादा ट्रक आदी विविध भंगारातील साहित्य समुद्रात बुडविले जात असून ज्या भागात उथळ समद्र आहे त्या ठिकाणी या कृत्रिम भित्तीकेतून प्रवाळ निर्मिती होऊन मत्स्य उत्पादन वाढेल या कल्पनेतून शासन पातळीवर प्रयत्न होत आहेत.
…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
सातपाटी येथील समुद्रात बुधवारी दुपारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभाग पालघरच्या सहकार्याने कृत्रिम भित्तिका निर्माण करण्याचे काम सुरू होते. मोठ मोठे सिमेंट आणि तत्सम प्रकारचे कृत्रिम वस्तूंचे हे भित्तीका टाकण्यात येत असताना अवाढव्य असलेल्या बोटीच्या चालकाला समुद्राच्या स्थितीचा अंदाज न आल्याने ही बोट खडकात अडकली. बोट अडकल्याने बोटीतील सर्व ११ जण बोटीतच समुद्रात अडकले. या बोटीतील चार जण स्थानिक तर उर्वरित सात जण हे बोटीसोबत जिल्ह्याबाहेरील असल्याचे कळते. बोट अडकल्यानंतर स्थानिक मच्छिमार लहान बोटीतून समुद्रात मासेमारीला गेले असता त्यांना हा संपूर्ण प्रकार निदर्शनास आला त्यानंतर भित्तिका टाकणाऱ्या या बोटीत अडकलेल्या चार स्थानिकांना आपल्या बोटीत घेऊन सुरक्षितस्थळी आणण्यात आले. इतर सात जणांची बोटीतच सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली व समुद्राला भरती आल्यानंतर सदर बोट खडकातून काढण्यात येणार आहे. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सातपाटी पोलिसांनी देखील बोटीतून घटनास्थळाला भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed