हैदराबादला एका इव्हेंटसाठी जायचे आहे, अशी माहिती डॉलीला देण्यात आली. आपल्या कामानिमित्त आपण जात आहे, एवढेच डॉलीला माहीत होते. एका हॉटेलमध्ये डॉलीच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस शुटींग चालले. डॉली समोर उभ्या असलेल्या ८ परदेशी व्यक्तींपैकी बिल गेट्स कोण हेही त्याला माहीत नव्हते. डॉली आणि बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बिल गेट्स यांनी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्याने डॉलीवर शुभेच्छांचा पाऊसच सुरू झाला. त्यानंतर बिल गेट्स या नावाची खऱ्या अर्थाने ओळख झाली, अशी प्रांजळ कबुली डॉलीने दिली. गुरूवारपासून त्याने सदर भागातील जुन्या व्हीसीए मैदानाजवळील आपल्या ‘डॉली की टपरी’ येथे आपल्या हटक्या स्टाइलने चहा विकायला सुरुवातही केली.
प्रेयसीच्या नावामुळे बनला डॉली
‘डॉली की टपरी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉलीचे मूळ नाव सुनील पाटील असे आहे. त्याचा भाऊ शैलेश गेल्या २५ वर्षांपासून व्हीसीए मैदानाजवळ चहा विकतो. दहा वर्षांपासून डॉली या व्यवसायाशी जुळल्या गेला. ७ भाऊ आणि एक बहीण असा डॉलीचा परिवार इंदोरा भागात राहतो. डॉली नेहमीच कॅप्टन जॅक स्पॅरोच्या लूकमध्ये दिसतो त्याची स्टाइल ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत आली आहे.
अभिनेता रजनिकांतची स्टाइल डॉलीला आवडते. हीच स्टाइल त्याने चहा विकताना अवलंबली. उंचावर धरून गंजात दूध ओतणे, चपळाईने काचेचे ग्लास रचने, कॅटलीतून कपात चहा ओतून ग्राहकाला कळायच्या आतच त्याच्या हातात देणे. चहाच नाही तर विलायचीचे दाणेही हातात देऊन गोडवा टिकविणाऱ्या सुनीलला त्याची प्रेयसी डॉली हिच्या नावाने मित्र चिडवू लागले. याच डॉली नावाने तो आता फेमस झाला आहे, असे डॉलीचा भाऊ शैलेश याने सांगितले.
मोदींना चहा पाजण्याची इच्छा
आज प्रसिद्धी आणि पैसे मिळत असले तरी सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. सायकलने चहा विकण्यासाठी येत होतो. कितीही प्रसिद्ध झालो तरी चहाचा व्यवसाय सोडणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या हटक्या स्टाइलमध्ये चहा पाजायचा आहे, अशी इच्छा डॉलीने व्यक्त केली.