• Mon. Nov 25th, 2024

    मूल होत नसल्याने पतीकडून छळ, सासरच्यांची विवाहितेला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    मूल होत नसल्याने पतीकडून छळ, सासरच्यांची विवाहितेला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    धनाजी चव्हाण
    परभणी: तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊनही तुला मुलबाळ झाले नाही. तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला वंशाचा दिवा मिळत नाही, असे म्हणून विवाहितेला दिवसेंदिवस उपाशी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच माहेरहून शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, म्हणत विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी पीडित विवाहितेने आपल्या भावासह परभणीच्या दैठणा पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे नाव राणी वशिष्ठ कदम (२७) असे आहे. राणीचा विवाह परभणी तालुक्यातील सूर पिंपरी या गावातील वशिष्ठ कदम यांच्याशी मे २०१८ मध्ये झाला होता. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे राणीच्या आई-वडिलांनी लग्नात सर्व संसार उपयोगी साहित्य देऊन लग्न लावून दिले होते. लग्नानंतर राणी आपल्या पतीसोबत सासरी राहायला गेली.
    आईस्क्रीम खाल्याने विषबाधा झाल्याचा आरोप; धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून बेकरीची तोडफोड
    लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी पंधरा ते वीस दिवस राणीला चांगले नांदवले. दरम्यान पतीने राणीच्या अंगावरील सगळे दाग-दागिने काढून घेतले. त्यानंतर घरगुती कारणावरून राणीला शिवीगाळ आणि लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. राणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडील आणि भावाला सांगितला. राणीच्या वडिलांनी घरी येऊन वरांसह सासू-सासर्‍यांना समजावून सांगितले. त्यानंतर सासरच्यांनी काही दिवस आणखीन चांगले नांदवले.

    राणीची ननंद अधून मधून सासरी येऊन पती आणि सासू-सासऱ्यांना राणीच्या विरोधात भडकावून देत होती. नणंद अयोध्या हिनेदेखील राणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पण सासरी राणीच्या बाजूने कोणीच आले नाही. उलट पती आणि सासू-सासर्‍यांनी राणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. राणीने पुन्हा आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी राणीलाच काळ बदलत असतो, असे म्हणत त्रास सहन कर असे सांगितले. पण सासरच्यांनी राणीला केवळ शारीरिक मानसिकच त्रास दिला नाही तर घराबाहेरही काढून दिले.

    राणीच्या वडिलांनी पुन्हा राणीला सासरी सोडून पती आणि सासू-सासर्‍याची समजूत काढली. दरम्यान राणीने आपल्यावर होत असलेला शारीरिक मानसिक छळ सहन न झाल्याने सासरच्या लोकांविरुद्ध दिवाणी न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. राणी कोर्टात गेल्याचे कळाल्यानंतर पुन्हा सासरच्या लोकांनी राणीला आणखीन जास्त त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान राणीचे वडील शिवाजी बाबर यांचे २०२० मध्ये निधन झाले. राणीच्या डोक्यावरचे छत्र हरवले. सासरच्या मंडळींनी राणीला सांभाळून घेण्याचे सोडून तिला उलट जास्त त्रास देण्यास सुरुवात केली.

    मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर अजित पवारांच्या उमेदवाराचं पण काम करणार | शिवाजीराव आढळराव पाटील

    राणीच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाले होते. तुला अद्यापही मूळ बाळ होत नाही. तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला वंशाचा दिवा मिळत नाही, असे म्हणून राणीला सासरच्या लोकांकडून त्रास सुरू झाला. राणीला दिवसेंदिवस उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. त्यातच पती वशिष्ठ कदम याने राणीला माहेरातून शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. राणीचे वडील मयत झाल्याने आता पैसे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. तिने पतीकडे विनवणी देखील केली की आता माझे वडील वारले आहेत मी पैसे कोठून आणू.

    मात्र राणीच्या पतीने राणीचा भाऊ श्याम बाबर याला गावी बोलावले. त्याच्यासोबत राणीला घराबाहेर हाकलून दिले. तीन लाख रुपये घेऊन ये, तरच घरामध्ये तुला प्रवेश दिला जाईल, असे देखील पतीने सांगितले. राणी आपल्या जीवनात हतबल झाली. एकीकडे सासरच्या मंडळींचा होत असलेला शारीरिक आणि मानसिक त्रास, दुसरीकडे वडिलांचे झालेले निधन आणि पुन्हा सासरच्यांकडून तीन लाख रुपयांची मागणी. शेवटी राणीने पुन्हा परभणी येथील भरोसा सेलकडे अर्ज केला. झालेला सर्व शारीरिक मानसिक त्रास सांगितल्यानंतर सासरच्या मंडळींना बोलावण्यात आले. पण सासरच्यांसोबत समझोता झालाच नाही. शेवटी राणीच्या तक्रारीवरून पती वशिष्ठ कदम, सासू शीला कदम, सासरा पंडित कदम, ननंद आयोध्या चव्हाण यांच्याविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *