राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे पक्षनाव देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश देऊन, आठवडाभरात पक्षचिन्ह देण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे पक्षचिन्ह देण्यात आले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आयोगाने यापूर्वी दिला असून, अजित पवार यांच्या गटाकडे ‘घड्याळ’ हे चिन्ह कायम राहिले आहे.
पवार गटाच्या चिन्हावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, भाजप यापेक्षा वाईट काय करणार आहे? “तुतारी शुभ काळात वाजवतात तर अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे मशाली ‘ असे म्हणतात आणि दोघांनाही ‘हाता’ची जोड लागतेच. तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला पवारांनी तुतारी घेतली असावी”
आशिष देशमुख मागच्या दारातून येऊन भेटतात
नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे. जिथे भाजपमध्ये नंबर दोन वर होते, ते आमच्या संपर्कात आहे. अनेक लोकं आम्हाला संपर्क करत आहेत. आशिष देशमुख दोनदा मागच्या दारातून भेटून गेले, असं वडेट्टीवार म्हणाले. ज्यांच्या रक्तात बेइमानी आहे, वारंवार पार्ट्या बदलतात ते इमानदारीची भाषा काय करतील, असा हल्लाही त्यांनी देशमुखांवर चढवला.
जोशी सरांच्या निधनाने सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले : वडेट्टीवार
ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी सरांच्या निधनाने सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले आहे. सरांच्या जाण्याने मोठी हानी झाली असून त्यांची उणीव सदैव भासणार आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शोक संदेशात म्हणाले,’ नगरसेवक, महापौर, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्वाची पदं भूषविणाऱ्या आदरणीय जोशी सरांचं व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. व्यासंगी राजकारणी ही त्यांची ओळख सर्वशृत आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे, विकासाचा ध्यास असणारे ते नेते होते. कोहिनूर सारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून सरांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही, टॅकरमुक्त महाराष्ट्र घोषणा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवातही आदरणीय जोशी सरांच्या प्रयत्नाने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. जोशी कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोशी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करतो. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. मी आदरणीय जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.