पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्षपदाचा कार्यभार शिवाजीराव आढळराव यांनी बुधवारी स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
लोकसभेचा पत्ता कट?
म्हाडाच्या सभापतीपदी आढळराव यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिरूर लोकसभेचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू झाली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या सभापतीपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. पण माझा लोकसभेचा पत्ता कट झाला असा विषय नाही. हा विषय दीड वर्षापासून प्रलंबित होता. नेमणूक होण्यास उशीर झाला,’ अशा शब्दांत लोकसभेचा पत्ता कट झाल्याची चर्चाला आढळराव यांनी फेटाळून लावले.
शिरूरची जागा कोणाकडे?
‘शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या चर्चेत मतदारसंघातील क्रमांक एकचा उमेदवार समोरच्या विरोधकांकडे असेल तर त्यात दुसऱ्या क्रमाकांची मते शिवसेनेला मिळाली आहे. उमेदवार निवडून आला नसेल तर त्या जागेवर दावा करू शकणार नाही ही मुख्यमंत्र्यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. उद्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला शिरूरची जागा दिल्यास त्यावेळी माझी हरकत असणार नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणणे हेच उद्देश आहे. उद्या अजित पवारांनी कोणताही उमेदवार दिला तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार आम्हाला काम करावे लागेल,’ अशी शिवाजीराव आढळराव यांनी भूमिका स्पष्ट केली.
अपयश झाकण्याचा कोल्हे यांचा प्रयत्न
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आढळराव यांनी तोंडसुख घेतले. ‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कोल्हे हे बेंबीच्या देठापासून भाषणे ठोकत आहेत. गेल्या पाच वर्षात काम करता आले नाही. मालिकाविश्वाला रामराम करणार असे सांगताना उलट खासदारकीला रामराम केला. पाच वर्षात एकाही रुपयाचे काम त्यांनी केले नाही. मी मंजूर केलेल्या कामे ती स्वतःची कामे म्हणून दाखवितात. जो काम करीत नाही तो श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. बैलगाडी शर्यताची १७ वर्षांचा प्रवास आहे. माझ्यावर चार गुन्हे दाखल झाले आहेत. संसदेत मी खासगी विधेयक मांडले. त्यांनी तीन वेळा तर मी सहा वेळा या विषयावर भाषणे केली. अनेक आंदोलने केली आणि ते श्रेय घेतात,’ अशी टीकाही त्यांनी केली.
आढळराव म्हणाले…
-मी कोल्हे यांच्यासारखे पक्ष बदलले नाही.
-मी आजही शिवसेनेतच
-उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना राष्ट्रवादीसोबत संघर्ष नको म्हणून पक्षाचे काम द्या. मला तिकिट नाही मिळाले तरी चालेल अशी भूमिका मांडली होती.
-मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी पदभार स्वीकारला आहे
-दर्जेदार म्हाडाचांच्या घरांची बांधणी करण्याचा माझा प्रयत्न राहील