म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या दोन गावांच्या मधोमध असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह झाला. या सप्ताहात एकादशीनिमित्त देण्यात आलेल्या भगरीच्या प्रसादातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाली. रुग्णांची संख्या अधिक असल्याने खाली झोपवून दोरीला सलाइन बांधून उपचार करण्यात आले.विठ्ठल-रखुमाई मंदिरात १४ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. मंगळवारी एकादशी असल्याने भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्यात आला. प्रसाद खाल्ल्यानंतर घरी गेलेल्या भाविकांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर, हगवण अशी लक्षणे दिसू लागली. या रुग्णांना बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. एकापाठोपाठ एक रुग्णांची संख्या वाढू लागली. खासगी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. रुग्णांची संख्या अधिक व रुग्णालयात प्रमाणात बेड नसल्याने दवाखान्याबाहेर मोकळ्या मैदानात ताडपत्री टाकून, झाडाला दोरी टांगून रुग्णांना सलाइन लावण्यात आले.
कल्याण रेल्वे स्थानकात ५४ डिटोनेटर स्फोटकं, सर्वत्र खळबळ, सफाई कर्मचाऱ्यांमुळे घटना उघडकीसजिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि डॉक्टरांच्या पथकाने भेट दिली. नागरिकांच्या वैद्यकीय सोयीसाठी दिवसभर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत.
परिस्थिती नियंत्रणात
लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे झालेल्या विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात आहे. यातील विषबाधा झालेल्या सुमारे १९२ जणांवर बीबी, लोणार ग्रामीण रुग्णालय आणि मेहकर येथे उपचार करण्यात आले. यातील सर्व जणांना कोणताही धोका नसल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. वयोवृद्धांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.