• Sat. Sep 21st, 2024

अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका

अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘अजितदादांचा भाजपामध्ये वट आहे, असे वाटत होते; पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांचा वट राहिला नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत असून, विधानसभेला २० जागा मिळतील किंवा तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढा, असे सांगितले जाईल,’ अशी बोचरी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

पिंपरीत पक्ष कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, रविकांत वर्पे, माधव पाटील, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

रोहित म्हणाले, ‘लोकसभेला भाजपाला दोन्ही पक्षांची गरज आहे; पण अजितदादा व एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी केले जात आहे. त्यामुळे लोकसभेनंतर त्यांची किंमत काय होईल, ते आताच सांगता येत नाही. लढायचे असेल, तर वेगवेगळे लढा अशी परिस्थिती होणार आहे.’

‘पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत काहीही होऊ शकते. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार होती, असे कळले; पण तसे न झाल्यामुळे लोकसभेला ते उभे राहतील. शिरूरमध्ये शक्यता कमी आहे; परंतु बारामती किंवा नगर येथून त्यांना उमेदवारी मिळू शकते,’ असेही रोहित म्हणाले.

‘अनिल तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही. अनिल तटकरे आमच्या संपर्कात होते आणि आजही आहेत,’ असेही रोहित यांनी सांगितले.

‘आम्हाला निर्णय आवडला नाही’

अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘युगेंद्र आणि मी आजोबांच्या विचारासोबत राहून त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली. अजितदादांच्या बाबतीत पवार साहेब यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका सर्व पवार कुटुंबीय जाणतात. मात्र, त्यांनी सत्तेसाठी व कारवाई होऊ नये, यासाठी घेतलेला निर्णय आम्हाला कोणालाही आवडला नाही.’

‘फसवणूक झाल्याची भावना’

रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर बोलताना, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल शंका उपस्थित होऊ लागली असून, समाजाची फसवणूक झाल्याची भावना आहे. १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आरक्षण आले आहे. लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed