ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केल्याने मलाही याचा आनंद आहे. माझ्या भूमिकेला माझे आई-वडीलही मला पाठिंबा देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुत्र जय पवार, पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आपण मैदानात उतरणार आहात का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही सर्व भाऊ लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहोत तर ही चांगली गोष्ट आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, शरयू उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले युगेंद्र पवार हे जलसंधारण, ओढा खोलीकरण, पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात योगदान देतात. त्यांनी अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या आहेत. युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते, मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा बारामती मध्ये शरद पवार यांच्या गटाला कार्यकर्ते आहेत की नाही असा सवाल उपस्थित झाला. त्याचवेळी पहिल्यांदा त्यांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचे मैदान आयोजित करून शरद पवार यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या या कृतीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार हे थेट आपले चुलते अजित पवार यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटून त्यांना पाठबळ देणार आहेत.