• Fri. Mar 20th, 2026
    महिला अत्याचाराचा आरोपी अशोक खरात हा महिला आयोग अध्यक्षांचा निकटवर्ती, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

    Nashik Woman Assault Case : अशोक खरातची ‘भोंदूगिरी’ उघड झाल्यावर सत्ताधारी नेत्यांवर विरोधकांनी टीकास्र डागले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरही या खरातच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महिला अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित अशोककुमार खरात ऊर्फ कॅप्टन याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबत छायाचित्रे व सलगी असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरातची ‘भोंदूगिरी’ उघड झाल्यावर सत्ताधारी नेत्यांवर विरोधकांनी टीकास्र डागले असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या संशयिताच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही होत असून, इतर नेत्यांनीदेखील आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

    अशोक खरात याच्या मागील सर्व कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) नाशिक शहर पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालेल्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

    बड्या नेत्यांशी संबंध

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, खासदार नीलेश लंके यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींची संशयित खरातसमवेत छायाचित्रे आहेत. पोलिस विभागासह विविध प्रशासकीय गटांतील वरिष्ठ अधिकारीदेखील संशयिताकडे ‘भविष्याचे वेध’ ऐकण्यासाठी जात असल्याची कुजबूज आहे.

    नेमके काय घडले?

    अत्याचाराची घटना कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयात घडली. पीडितेचे लग्न जमत नसल्याने तिच्या मेहुण्याने ऐकीव माहितीवरून खरातकडे मार्च २०१९ मध्ये नेले. स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे आणि मंत्र-तंत्राद्वारे समस्या सोडवू शकत असल्याचा दावा खरातने केला. सन २०२० मध्ये करोनामुळे कुटुंबीयांनी तिचे लग्न स्थगित केले. जुलै २०२१ मध्ये पीडितेचे लग्न ठरले, तेव्हा एक खडा गळ्यात बांधण्यासाठी खरातने पीडितेला दिला. महाविद्यालयीन शिक्षणामुळे तिने काही दिवसांनी तो खडा काढला. त्यानंतर तिचे लग्न मोडले. परिणामी, खडा काढल्याने लग्न मोडल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांना वाटले.
    Maharashtra TimesIndore Fire : इलेक्ट्रिक कार चार्ज करताना आग, एकामागून एक सिलेंडर फुटले, कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, डिजिटल लॉकमुळे कोंडी
    पुन्हा ५० हजारांचा एक खडा खरातने पीडितेला दिला. नव्याने लग्न ठरल्यावर होणाऱ्या पतीसह पीडिता तेथे गेली. सिन्नरच्या मंदिरात पूजा करण्याचे सांगून २८ हजारांचे दोन खडे खरातने दिले. ‘खडा काढला तर लग्न मोडेल, विधी न केल्यास होणारा पती मरेल,’ अशी भीती घालून खरातने पीडितेवर मानसिक दबाव आणला. लग्नानंतर २०२२ मध्ये खरातने पीडितेला प्रसादाच्या नावाखाली पेढा आणि खारट-कडवट चवीचे पाणी प्यायला दिले. पीडितेला गुंगी आल्यानंतर खरातने तिच्यावर अत्याचार केला.

    Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं

    वारंवार अत्याचार

    लग्नानंतर २०२३ मध्येही पीडितेच्या पतीला चेंबरबाहेर बसवून संशयिताने तिच्याशी कुकृत्य केले. एका वेळी पीडितेला शारीरिक इजा होऊन रक्तस्त्रावदेखील झाला होता. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘आशीर्वाद’ देण्यासह ‘कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला ठार मारीन, तुझे चारित्र्य खराब करून आयुष्य उद्ध्वस्त करीन,’ असे धमकावून संशयिताने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.
    Maharashtra TimesCrime News : एक बायको सोडून गेली, दुसरी गरोदर; बालिकेवर पाच वर्ष अत्याचार, विकृत कीर्तनकारावर गावकरी संतापले, फोटोला जोडे
    खरातच्या भोंदूगिरीबद्दल पीडितेच्या मेहुण्याला १५ मार्च २०२६ रोजी समजले. त्यांनी विश्वासात घेतल्यावर पीडितेने आपबिती सांगितली. त्यानुसार १७ मार्च रोजी पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा