स्वरूप सोरटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोनार, करण गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून उर्वरित दोघांची ओळख पटविली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान हा वाद भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील नसून कार्यकर्त्यानी शांत राहावे असे आवाहन कोळसेवाडी पोलिसांनी केले आहे. तर या घटनेनंतर परिसरात तणाव असून परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र कल्याण पूर्वेतील मागच्या काही महिन्यातील घटना पाहता, पोलिसांच्या भूमिकेवर जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
पोलिसांनी नेमके काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले, तिसगाव भागात आमदार गायकवाड यांचे भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे एका गाळ्यामध्ये जय मल्हार, श्री साई केबल नावाने कार्यालय आहे. कार्यालयात केबल नियंत्रण करणारे कर्मचारी कार्यरत असतात. सोमवारी संध्याकाळी दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून अभिमन्यू गायकवाड यांच्या केबल कार्यालयासमोर आले. ते बाहेरून कार्यालयाची टेहाळणी करत होते. कार्यालया समोर कर्मचाऱ्यांचे वाहन उभे होते. अनोळखी इसम बाहेरून कसली पाहणी करतात, हे पाहण्यासाठी आणि त्यांना विचारण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी बाहेर आला.
कर्मचारी विचारणा करत असताना दुचाकीवरील तरुणांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली. आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेऊन त्यांनी केबल कार्यालयात जाऊन तेथे तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी घाबरले. कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाण, तोडफोडीचा प्रकार कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांना तोडफोडीचं वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणातून चारही हल्लेखोरांची ओळख पटवली.