मनसे पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीबाबत आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, “आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत, येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा,” असं राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे.
“सरकारबद्दल लोकांच्या मनात राग”
मनसेच्या सदस्य नोंदणीबद्दल पदाधिकाऱ्यांना सूचना देत असताना राज ठाकरे यांनी सरकारवरही हल्लाबोल केला आहे. “प्रश्न आकड्याचा नाही. कारण तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा,” असं ते म्हणाले.
दरम्यान, “१९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.