• Mon. Nov 25th, 2024
    एक लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट, राज्यभरात उद्यापासून विशेष मोहीम, सामान्यांना विनामूल्य सुविधा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये एक लाख रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक रुग्णालये, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था तसेच रुग्णालयांमध्ये विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून त्याचा सामान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

    या मोहिमेअंतर्गत राज्यभरात एक लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारची राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ही विशेष मोहीम जून २०२२पासून राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये अंधत्व आणि एसव्हीआयला कारणीभूत असलेल्या मोतिबिंदूवरील शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रकियेचा लाभ घेता येणार आहे.

    १०४ टोलफ्री क्रमांक

    सन २०२२-२३मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे ११२.५१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे, तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६७.३० टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम’ राबवण्यात येणार आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed