• Mon. Nov 25th, 2024

    हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजकडेच पेंडिंग, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, ‘समाजकल्याण’ने घेतली दखल

    हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजकडेच पेंडिंग, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, ‘समाजकल्याण’ने घेतली दखल

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नागपूर विभागातील ३२ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्जच सादर केलेले नाहीत. १९ हजार ७९६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा समाजकल्याण विभागाकडून देण्यात आला.

    -अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे मॅट्रिकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.

    -सन २०२३-२४मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील १२ फेब्रुवारी २०२४पर्यंत ५२ हजार ६२२ अर्जांची ऑनलाइन नोदणी झाली आहे. त्यापैकी समाजकल्याण विभागाने २७ हजार ६२० अर्ज मंजूर केले आहेत.

    -१९ हजार ७९६ अर्ज महाविद्यालयांकडेच प्रलंबित असल्याने त्यावर समाजकल्याण विभागाला कार्यवाही करता आलेली नाही. तसेच ३,६९० विद्यार्थ्यांनी महविद्यालयाकडे त्रुटीपूर्तता करून अर्ज सादर केलेले नाहीत.

    नवीन वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच साडेतेरा लाखांची लाचखोरी, २० जणांवर कारवाई, एसीबीसमोर आव्हान
    – २०२२-२३मध्ये नागपूर विभागात एकूण ८५ हजार १९५ इतक्या विद्यार्थाना शिष्यवृती प्रदान करण्यात आली होती. त्यापैकी १२ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५२ हजार ६२२ अर्जांची नोंदणी म्हणजेच केवळ ६१ टक्के अर्जांचीच ऑनलाइन नोंदणी झाली आहे.

    -नागपूर विभागातील महाविद्यालय स्तरावर नागपूर १०,२८६ अर्ज, वर्धा २,३७२, भंडारा २,२७३, गोंदिया १,३२०, चंद्रपूर २,९१७ तर गडचिरोली ६२८ असे एकूण १९,७९६ इतके अर्ज प्रलंबित आहेत.

    -२०२३-२४ या वर्षात महाविद्यालयामंध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, यांनी केले आहे.

    -अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करण्यात येईल, या संदर्भात कठोर पावले उचलले जातील, असा इशारा प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed