• Mon. Nov 25th, 2024

    इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी, गूढ उकलताच पोलिस हादरले

    इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी, गूढ उकलताच पोलिस हादरले

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्याचा ‘उद्योग’ पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटकही करण्यात आली आहे.

    मित्रांनीच रचले कुभांड

    विद्यार्थ्याच्या चार मित्रांनीच देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे कुभांड रचल्याचे उघड झाले आहे. अपहरण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस नाईक हेमंत गायकवाड आणि शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, महंमद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी (पूर्ण नाव पत्ता उपलब्ध नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

    पैशांसाठी केला ‘उद्योग’

    किवळ्यातील ‘सिम्बायोसिस’मध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या वैभवसिंह मनीषकुमारसिंह चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवसिंह इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, ‘सिम्बायोसिस’च्या होस्टेलमध्ये राहतो. त्याचे वडील बड्या कंपनीत सीईओ आहेत. पैशांची गरज असल्याने आरोपींनी वैभवसिंहला लुटण्याचा डाव आखला.

    गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग

    काही महिन्यांपूर्वी गस्तीवर असताना आरोपींना दोघा पोलिसांनी हटकले होते. तेथून त्यांची आणि आरोपींची ओळख झाली. त्यातूनच आरोपींनी आपल्या प्लॅनमध्ये पोलिसांना सामील केले. दहा फेब्रुवारीला दुपारी सव्वाबारा वाजता आरोपींनी गांजासदृश पाने असलेली एक पुडी वैभवसिंहच्या खिश्यात टाकली. त्यानंतर हे सर्व किवळ्यातील ‘कॅफे मायाज लॉन्ज’ येथे गेले. तेथे पोलिस कर्मचारी गायकवाड आणि शेजाळही पोहोचले. सर्वांची तपासणी केली असता, आरोपींनी वैभवसिंहच्या खिशात टाकलेली पुडी गायकवाड आणि शेजाळ यांनी बाहेर काढली.

    वडिलांकडून उकळले पाच लाख

    त्यानंतर वैभवसिह याला देहूरोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. गांजा बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन वैभवसिंहच्या वडिलांशी संपर्क साधला. हा प्रकार टाळण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे घाबरलेल्या वैभवसिंह याच्या वडिलांनी ‘गुगल पे’ आणि ‘नेट बँकिंग’द्वारे आरोपींच्या विविध खात्यांवर चार लाख ९८ हजार रुपये हस्तांतर केले.

    तळेगाव पोलिस मदतीला धावले

    या प्रकारानंतर परिचिताच्या मदतीने वैभवसिंह तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्याने घडलेला प्रकार वरिष्ठ निरिक्षक शंकर अवताडे यांच्या कानावर घातला. पोलिसांचा थेट सहभाग असल्याने तातडीने सर्व वरिष्ठांना प्रकरणाची कल्पना देण्यात आली. त्यानंतर वैभवसिंहच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगूट पाटील यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *