राहुल कुल हे दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी दौंडमधून त्यांचे खंदे समर्थक रमेश थोरात यांना राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उतरवले होते. परंतु कुल यांनी थोरात यांचा पराभव केला. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार आणि कुल कुटुंबात मोठी दरी निर्माण झाली होती. कारण राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपच्या कांचन कुल यांनी तगडा प्रचार करून सुळे यांना झुंजवलं होतं.
बेरजेच्या राजकारणाला सुरूवात
आता राष्ट्रवादीत फूट पडून पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. शरद पवार गटाकडून बारामती लोकसभेची जागा सुप्रिया सुळे याच लढवणार हे स्पष्ट आहे. अजित पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे. बारामतीत यानिमित्ताने नणंद-भावजय असा सामना रंगणार आहे. त्यामुळे बेरजेची गणिते आखण्यासाठी सुनेत्रा पवार देखील सक्रिय झाल्या आहेत. बारामतीत त्यांच्या उपस्थितीत मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. आता त्यांनीच कुल यांच्या घरी भेट देत बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. महायुतीच्या त्या उमेदवार असतील तर कुल कुटुंबालाही त्यांचा प्रचार करावा लागेल.
कुल-पवार यांच्यात जुने संबंध
खरे तर सुनेत्रा पवार व कांचन कुल या जवळच्या नातेवाईक आहेत. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर हे आहे. राजेनिंबाळकर घराण्याच्या त्या कन्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या धाराशीव येथील पाटील घराण्याचे व राजेनिंबाळकर घराण्याचा स्नेहसंबंध आहे. राहुल कुल यांच्या विवाहावेळी सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांचे संबंधही स्नेहपूर्ण होते. परंतु गत लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्यात अंतर पडले होते. हे अंतर आता कमी केले जात आहे.
या भेटीवेळी दौंडच्या माजी आमदार रंजना कुल, राहुल कुल, कांचन कुल आदी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या भेटीमुळे दौंडमधील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मोठी गोची झाली आहे. आजवर तालुक्यात ज्यांना कडाडून विरोध केला, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर येईल अशी चिन्हे आहेत.