नवीन मोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी पक्ष निरीक्षक तथा छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष शेख युनूस हे उपस्थित होते. शिवाय काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह तीन माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कैलासवासी. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मजबूत करण्याचं काम केले आहे. चव्हाण यांनी पक्ष सोडला नाही, तर भाजपने पक्ष सोडण्यास भाग पाडले आहे. मजबुरी असल्यामुळे ते भाजपात गेले, असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्रास देण्यात आला. इतर लोकांना देखील ईडीकडून त्रास देण्यात येतोय, म्हणून भाजपाच्या या त्रासाचा बदला काँग्रेस पक्ष घेतल्याशिवास राहणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी दिली.
नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला कायम राहील
नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, आणि पुढेही हा बालेकिल्ला कायम राहील, संपूर्ण लोक काँग्रेस सोबत आहेत, आम्ही सर्वजण पदाधिकारी बसून अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवणार असल्याचे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक यांनी सांगितले. जे कोणी पक्ष विरोधी कार्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रदेश काँग्रेस आणि केंद्रीय काँग्रेस कमिटीचे संपूर्ण लक्ष नांदेड जिल्ह्यावर आहे. जे काँग्रेस पक्षाची विचारधारा मानतात त्यांना सोबत घेऊन पुन्हा नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनवणार असल्याचे पक्ष निरीक्षक शेख युसुफ म्हणाले.
मी काँगेससोबत; लग्नकार्य असल्याने बैठकीला गेलो नाही
अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलल्यानंतर प्रदेश काँग्रेसने मुंबईत काँगेस आमदाराची बैठक बोलावली. त्या बैठकीला काँग्रसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे अनुपस्थित होते. येत्या १८ तारखेला मुलाचं लग्न असल्याने आपण बैठकीला गेलो नाही, तशी माहिती आपण प्रदेश काँग्रेसला दिल्याचे हंबर्डे म्हणाले. राज्यसभेसाठी मतदानाची गरज पडली तर आपण मतदानासाठी जाणार असल्याचे आमदार मोहन हंबर्डे म्हणाले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने मोठं नुकसान झालं आहे. पण आम्ही कैलासवासी. शंकरराव चव्हाण यांचे विचार घेऊन काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचे आमदार मोहन हंबर्डे यांनी सांगितले.
