राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. वडिलांनी घेतलेले उसने पैसे परत न दिल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे, तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे प्रकरण माध्यमाद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पुणे पोलिसांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला आरोपी पती पत्नी विरोधात पॉक्सो, पिटा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून याबाबत जलद कारवाई करण्याचे तसेच पीडितेचे समुपदेशन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत, असं ट्वीट चाकणकर यांनी केलं आहे.
पूनम आकाश माने असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. तिचा साथीदार आकाश सुरेश माने (वय २४) हा फरार झाला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधी दरम्यान फिर्यादी मुलीच्या घरी, के. के. मार्केट जवळील इशा लॉज, त्रिमूर्ती चौकाजवळ असलेल्या रिलॅक्स लॉजमध्ये तसेच धनकवडी येथील सायबा लॉज या ठिकाणी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे वडील आजारी असताना या आजारपणाच्या उपचारासाठी तिने आरोपींकडून तीस हजार रुपये उसने घेतले होते.
काही कारणांमुळे पीडित मुलगी पैसे परत देऊ शकली नाही. त्यामुळे आरोपींनी तिला जबरदस्तीने के. के. मार्केटजवळ असलेल्या ईशा लॉज येथे नेले. तिथल्या एका रूममध्ये १० ते १५ दिवस डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी आकाश माने याने तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी मिळून या मुलीला ”माझे पैसे दे, पैसे नाही दिले तर कुठूनतरी वसून करून दे. नाहीतर तुला सोडणार नाही” अशी दमदाटी करून तिच्याकडून वारंवार शरीर विक्री करून घेऊन येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे स्वीकारत आर्थिक लाभ घेतल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.