कारण, काँग्रेसमधून बाहेर पडताना नारायण राणेंनी अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले अन् भाजपमध्ये प्रवेश केला.. काँग्रेसमध्ये असताना राणेंना अशोक चव्हाण हे कायम मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धक होते, त्यात आता दोघेही भाजपात आले आणि पहिल्याच टप्प्यात राणेंचा पत्ता कट झाला. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर नारायण राणेंनाच परत एकदा संधी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण ऐनवेळी अशोक चव्हाणांची एन्ट्री झाली आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळालं. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत राणेंचे नेहमी खटके उडाले, तेच चव्हाण पुन्हा एकदा राणेंसाठी कसे अडचण बनलेत आणि या दोघांचं वैर नेमकं काय होतं? वाचा…
- २००५ मध्ये ११ आमदारांसह नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- राणेंना सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचं काँग्रेसकडून आश्वासन
- विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात राणेंची महसूल मंत्रिपदी वर्णी
- काँग्रेसमध्ये दाखल होऊन सहा महिने उलटले तरी राणेंना मंत्रिपदावरच समाधान मानावं लागलं
- मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुखांनाच कायम ठेवल्याने राणेंची निराशा झाली
राणेंनी दिल्ली दरबारी मुख्यमंत्री पदासाठी हालाचाली केल्या. पण विलासरावांची खुर्ची शाबूत राहिली. मात्र २६-११ च्या हल्ल्यानंतर विलासरावांची उचलबांगडी झाली. त्यावेळी आपल्याला मुख्यमंत्री करून काँग्रेस हायकमांड शब्द पाळेन, असा विश्वास राणेंना होता.. मात्र, त्यावेळीही राणेंचा डबल गेल झाला.
- काँग्रेस विधिमंडळ बैठकीत राणेंना ४८ आमदारांनी पाठिंबा दिला
- तर अशोक चव्हाणांना ३२ आमदारांची साथ मिळाली
- सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा देऊनही राणेंचं नाव जाहीर झालं नाही
- डिसेंबर २००८ ला राहुल गांधींशी जवळीक असलेल्या अशोक चव्हाणांची मुख्यमंत्री पदासाठी निवड
- २००९ च्या निवडणुकीनंतर अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी, राणेंना तिसऱ्यांदा डावललं
- अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाराजीतून राणेंनी सोनिया गांधींवर टीका केली
- परिणामी राणेंवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई
- ७० दिवसांच्या निलंबनानंतर राणेंची पुन्हा काँग्रेसमध्ये वापसी, उद्योगमंत्री पदी निवड
- नोव्हेंबर २०१० मध्ये अशोक चव्हाणांचा राजीनामा, पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याचा कारभार
- सोनिया गांधी, राहुल गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात धाडल्याने राणेंनी चव्हाणांविरोधात शांत राहण्याची भूमिका घेतली
- जुलै २०१४ ला राणेंनी नाराजी बोलून दाखवली, काँग्रेसने १२ वर्षात मुख्यमंत्री पदाचं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप
२०१४ च्या पराभवानंतरही राणे काँग्रेसमध्येच राहिले.. मात्र, प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या अशोक चव्हाणांना आव्हान देऊन राणेंनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री काळात अशोक चव्हाणांनी अनेक राणे समर्थकांची तिकीट कापून राणेंचं खच्चीकरण केल्याचं बोललं जातं.. त्यामुळे राणेंची कोकणातली ताकद कमी झाली
सप्टेंबर २०१७ मध्ये राणेंनी काँग्रेसचा राजीनामा देताच अशोक चव्हाणांनी मला विधानपरिषद मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचाही आरोप केला. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये येताच त्यांना राज्यसभा मिळाल्याने राणेंना काटशाह मिळाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.